हैदराबाद : स्टार खेळाडू राहुल चौधरीच्या नेतृत्त्वाखाली सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करताना तेलगू टायटन्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात तामिळ थलायवास संघाला ३२-२७ असे नमवले आणि प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात दमदार विजयी सलामी दिली. कर्णधार राहुलने पहिल्याच सामन्यात दहा गुणांची वसुली करताना वर्चस्व राखले. निलेश साळुंखेनेही आक्रमणात ७ गुण मिळवताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. येथील गचिबोवली बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत तेलगू संघाने सावध सुरुवात केल्यानंतर स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या तामिळ संघाला सहज नमवले. राहुलने शानदार खेळ करताना आक्रमणात तामिळचे बचाव भेदण्यात यश मिळवले. त्याचसह विशाल भरद्वाजचे भक्कम संरक्षण आणि निलेश साळुंखेची आक्रमणात मिळालेली साथ या जोरावर तेलगूने आघाडी वाढवताना अखेरपर्यंत तामिळ संघाला दडपणाखाली ठेवले. विशालने बचावामध्ये ५ गुण मिळवत तामिळची चांगली पकड केली. तेलगूने तामिळ संघावर एक लोण चढवताना आक्रमणात १९, तर बचावामध्ये ११ गुणांची कमाई केली. तामिळला लोण चढवण्यात अपयश आले. त्यांनी आक्रमणात १६ गुण, तर बचावामध्ये ९ गुण मिळवले. तत्पूर्वी, स्टार राहुल चौधरी व निलेश साळुंखे यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्सने मध्यंतराला १७-११ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले होते. राहुलने अपेक्षित कामगिरी करताना आक्रमणामध्ये तामिळ थलायवासला दडपणाखाली ठेवली. त्याचवेळी, दुसरीकडे निलेशनेही शानदार चढाईंचे प्रदर्शन करताना तामिळच्या आव्हानातली हवा काढली. तामिळकडून के. प्रपंजन (७), सी. अरुण (४), विनीत कुमार (३) आणि अनुभवी अजय ठाकूर (६) यांनी चांगली झुंज दिली. परंतु, राहुल - निलेश यांच्या धडाक्यापुढे त्यांचा फारसा निभाव लागला नाही.
प्रो कबड्डी : तेलगू टायटन्सची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 12:04 AM