सावंतवाडी : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने सेंट्रल इंग्लिश स्कूलला शालेय शिक्षण फी वाढीबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते. पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानेच वरील आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही फी वाढ करण्यात आल्याने पालकांनी याविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. सेंट्रल इंग्लिश स्कूलमधील पालकांनी केलेल्या उपोषणाला दुपारी गटशिक्षणाधिकारी एल. एम. देसाई व नायब तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी भेट दिली. सदर प्रकरणी पाठपुरावा करुन न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर पालकांनी उपोषण मागे घेतले. मात्र, आठ दिवसांत वाढीव फी कमी न केल्यास माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही दिला आहे. संस्था पदाधिकाऱ्यांनी शालेय कामकाजात हस्तक्षेप करत शालेय शिक्षण फी मध्ये १६५0 रुपयांची वाढ केली आहे. तसेच स्कूलच्या शिक्षक पालक कार्यकारिणी संघाची बुधवारी परस्पर निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित पालकांनी आपणास विश्वासात न घेता शिक्षक पालक कार्यकारिणीची निवड केल्याचा आरोप करत समिती अध्यक्ष इम्तियाज खानापुरी यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संस्थेने त्याआधीच पोलिसांना पाचारण केले असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत मध्यस्ती केली. सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये सन २0१३ रोजी ज्युनिअर केजी ते इयत्ता चौथीपर्यंत वार्षिक फी २000 होती. यावर्षी हीच फी ३६५0 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर पाचवी ते दहावीपर्यंतची फी २२00 रुपयांवरुन ३८५0 एवढी वाढविण्यात आली आहे. तसेच या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा मुलांना मिळत नाहीत आणि तरिही शालेय फी मध्ये १६५0 रुपयांची करण्यात आलेली वाढ आणि प्रतिमहिना घेण्यात येणारे ४00 रुपये हा प्रकार अन्यायकारक असल्याचे पालकांनी सांगितले. यावेळी नासीर रेडकर, जमीर बेग, खुदबुद्दीन शेख, रियाज महमद शेख, मुस्ताक नाईक, शरीफ शेख, समिरा खलील, शगुफ्ता शेख, फरद्दीन बेग, रफिदा नाईक, डायमंड शेख, सुलतान शेख, जमीर बेग, अहमद खान, समीर बेग, नगरसेविका अफरोज राजगुरु, शब्बीर मणीयार, महेश पांचाळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
फी वाढीविरोधात पालकांचे उपोषण
By admin | Published: July 03, 2014 11:53 PM