कणकवली, दि.६ : नगरसेवक म्हणून कार्यरत असतानाही गेल्या साडेसात वर्षामध्ये ज्या लोकांनी कणकवली शहराच्या विकासाकडे किंवा जनतेच्या मुलभुत सुविधाकडे लक्ष न देता फक्त स्वतःचाच विकास केला. त्या लोकांकडून आम्हाला विकासाबाबत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. आम्ही विकास करण्यास सक्षम असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. असा टोला कणकवलीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़ तसेच उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी राणे समर्थक नगरसेवकाना लगावला आहे.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात शुक्रवारी संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी कन्हैया पारकर म्हणाले, राणे समर्थक नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या विषय समिती निवडीच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालत असल्याचे गुरुवारी जाहिर केले. तसेच त्याचवेळी त्यांनी आमच्यावर टिका केली आहे. मात्र, स्वतः सत्ताधारी असताना त्याना शहरातील कोणतीही विकास कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे खरे तर त्यांना आमच्यावर टिका करण्याचा कोणताही अधिकार नाही.
आम्ही सत्ता हाती घेतल्यानंतर जनतेला अभिप्रेत असा विकास करण्याचे काम सुरु केले आहे. आमच्या कार्यकालात नगरपंचायतीत खऱ्या अर्थाने लोकशाही पुन्हा एकदा अवतरली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबध्दआहोत.
मुख्यमंत्र्यानी कणकवली शहराच्या विकासासाठी ख़ास बाब म्हणून सव्वा दोन कोटींचा निधी आमच्या प्रयत्नामुळे दिला आहे.तसेच उर्वरित निधी काही कालावधीतच देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे विकासकामे आणखिन गतीने होतील.आता विरोधाची भाषा करणारे नगरसेवक सत्तेच्या हव्यासापोटि आम्हाला विनाकारण विरोध करीत आहेत.
आता पर्यन्त नगरपंचायतीत आमच्या जोड़ीला खुर्चीला खुर्ची लावून बसणारे हे नगरसेवक विविध पदे उपभोगीत होते. मात्र, आता आपल्या कार्यकालाच्या उर्वरीत सहा महिन्यात जनतेची दिशाभूल करून सभापती निवडीवर बहिष्कार टाकत असल्याचे ते नाटक करीत आहेत.
नगरपंचायतीचा कारभार आम्ही ताब्यात घेतल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टीचे कधीच समर्थन केलेले नाही. मात्र, विरोधकाना कुठलेहि काम नियमबाह्य झाल्याचे वाटत असेल आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी करावी. असे आम्ही त्यांना जाहिर आव्हान देतो.
शहरातील नागरिकांना अनेक मुलभुत सुविधा आम्ही दिल्या आहेत. या सुविधामध्ये अजून वाढ व्हावी अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यांच्या सत्तेच्या कालावधीतील मागील पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यातच आमचा अडिच वर्षांचा कालावधी गेला आहे.हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे कोणी कितीही टिका केली तरी जनतेचा विश्वास आमच्यावर असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत.असेही कन्हैया पारकर यावेळी म्हणाले. जनतेच्या डोळ्यातील धूळफेक थांबवा !
नगरसेवक कार्यकालाचे शेवटचे सहा महीने शिल्लक राहिले असताना उगाचच आपण सक्षम विरोधक असल्याचे दाखविण्यासाठी राणे समर्थक नगरसेवकांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करु नये.
आपण प्रथम कणकवली नगरपंचायतीचे विश्वस्त आहोत आणि त्यानंतर पक्षाचे सदस्य आहोत.याचे भान या लोकांनी ठेवावे. तसेच नगरसेवक पदाच्या आपल्या उर्वरित कालावधीत जनतेच्या विकासासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन कन्हैया पारकर यांनी यावेळी विरोधी नगरसेवकाना केले.