सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरात राहणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्या घरातील बंद पिंजऱ्यात पोपट व शेकरू हे दोन वन्यजीव आढळून आल्याने सावंतवाडी वन विभागाकडून बेग याच्यावर कारवाई करण्यात आली. तर बेग याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. वन्यजीव नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथे कैस अब्दुल लतीफ बेग याने अवैधरीत्या संरक्षित प्राणी बंदिस्त करून ठेवले होते. याबाबतची माहिती गुप्त बातमीद्वारे वन विभागाला देण्यात आली. माहितीच्या आधारे सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर हे आपल्या गस्ती पथकासह कैस अब्दुल लतीफ बेग याच्या घरावर छापा टाकला. यावेळी बेग याच्या घराच्या मागच्या बाजूला पोपट व शेकरू हे वन्यजीव संरक्षित आढळून आले. हे संरक्षित प्राणी, त्याने पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. बेग यांची कसून चौकशी केली असता त्याने हे आपणच या प्राण्यांना बंदिस्त करून ठेवले असल्याचे मान्य केले. त्यानंतर वन्यप्राणी ताब्यात घेत कैस अब्दुल लतीफ बेग याला चौकशीसाठी वनविभागाने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद राणे, प्रमोद जगताप, पोलिस कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक महादेव गेजगे, दत्तात्रय शिंदे, प्रकाश रानगिरे, सागर भोजने, वैशाली वाघमारे आदिकडून करण्यात आली.
पोपट, शेकरू घरात बंद पिंजऱ्यात ठेवले; वन विभागाने सावंतवाडीत एकास घेतले ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: October 11, 2023 4:03 PM