बांदा : बांदा-आळवाडी येथे तेरेखोेल नदीपात्रालगत असलेली प्रवासी शेड गेले कित्येक वर्षे दुरुस्ती करण्यात न आल्याने मोडकळीस आली आहे. शेडचे छप्पर कोसळल्याने पावसाळ्यात ही शेड कोसळण्याच्या स्थितीत आहे.या प्रवासी शेडच्या दुरवस्थेबाबत स्थानिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, शासन पातळीवर याची दखल घेण्यात न आल्याने इमारत दुरुस्तीअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. तेरेखोल नदीपात्रावर शेर्ले ते बांद्यादरम्यान शेर्ले पंचक्रोशीतील लोकांना होडीतून प्रवास करावा लागतो. गेली कित्येक वर्षे होडी सेवा सुरूअसल्याने मेरीटाईम बोर्डाने प्रवाशांना थांबण्यासाठी बांदा तीरावर प्रवासी शेड उभारली आहे. मात्र, गेली २५ वर्षे या शेडची दुरुस्ती न केल्याने शेड मोडकळीस आली आहे. शेडचे छप्पर ठिकठिकाणी मोडकळीस आले आहे. छपराची कौले फुटली असून वासे पावसाच्या पाण्यात भिजून मोडकळलेल्या स्थितीत आहेत. अवकाळी पावसात छप्पर मोडल्याने कौले इमारतीत पडली आहेत.ग्रामस्थांनी याबाबत मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयाला इमारतीच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले आहे. शेर्ले परिसरातून बांदा येथे शेकडो शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी नदीपात्रातून प्रवास करून येतात. तसेच शेर्ले परिसरातील ग्रामस्थही याच मार्गाने बांदा शहरात येतात. त्यामुळे या प्रवासी शेडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या शेडची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
प्रवासी शेड मोडकळीस
By admin | Published: May 14, 2015 10:13 PM