वैभववाडी : सांस्कृतिक कार्यक्रमातून नवी पिढी घडते; परंतु सध्या घडविणे बंद आणि बिघडविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे लोकोत्सवातून समाजाच्या प्रगतीचा मार्ग निर्माण झाला पाहिजे. लोकोत्सवाने वैभववाडीची ऊर्जा आणि उत्साह वाढविला आहे. वैभववाडी लोकोत्सव यापुढे तालुक्यातील प्रत्येक घरात पोहोचण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. येथील दत्तकृपा प्रतिष्ठानतर्फे आयोजित वैभववाडी लोकोत्सवानिमित्त महिला व बालकांच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण रविवारी रात्री करण्यात आले. यावेळी माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, नगरसेवक सज्जन रावराणे, संतोष माईणकर, माजी सरपंच जयश्री रावराणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, रणजित तावडे, संजय नकाशे, संजय रावराणे, रत्नाकर कदम, सुरेश रावराणे आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, देश घडविण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे. हे जगच महिलांचे आहे. त्याचप्रमाणे लहान पिढी हे देशाचे भवितव्य आहे. या पिढीकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे दत्तकृपा प्रतिष्ठानने बालकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकोत्सवामुळे वैभववाडी तालुक्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे हा लोकोत्सव दरवर्षी यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. जयेंद्र रावराणे म्हणाले, लोकोत्सवामुळे तीन दिवस आनंद लुटण्याची संधी प्रतिष्ठानने वैभववाडीकरांना दिली. अशा सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी आपले पूर्ण सहकार्य राहील. लोकोत्सवानिमित्त प्रतिष्ठानचे मार्गदर्शक नगरसेवक संतोष माईणकर, तसेच लोकोत्सवाच्या पैठणीच्या खेळाचे नियोजन केल्याबद्दल निवेदक संतोष टक्के यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
लोकोत्सवातून प्रगतीचा मार्ग व्हावा
By admin | Published: April 12, 2016 9:49 PM