तळेरे : नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले तीन महिने कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना परत जावे लागत आहे. यामुळे दूरवरून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत नांदगाव ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धडक दिल्यानंतर रुग्ण समितीची बैठक झाली. मात्र, वरिष्ठांची भेट घेण्यासाठी ओरोस येथे जाण्याबाबत ग्रामस्थ तयार नसून नांदगांव आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी दोन डॉक्टरांची आवश्यकता आहे. तरीदेखील किमान एक कायमस्वरुपी डॉक्टर दिल्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तेथून हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाहीत. या आरोग्यकेंद्रात नांदगाव परिसरातील अनेक ठिकाणांहून रात्री-अपरात्री रुग्ण येत असतात. मागील आठवड्यात माईण येथील सर्पदंश झालेल्या रुग्णाला डॉक्टर नसल्याने इतरत्र हलविण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदगांव आरोग्य केंद्रात धडक दिली होती. त्यानंतर रुग्ण समिती यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत सोमवारी ओरोस येथे वरिष्ठांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु नांदगांव ग्रामस्थांना हे मान्य नसल्याने त्यांनी मंगळवारी नांदगांव आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले. जोपर्यंत या केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर दिल्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.लाखो रुपये खर्च करून नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. अशा आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसेल तर त्या इमारतीचा उपयोग काय? नांदगाव आरोग्य केंद्राची इमारत महामार्गालगत आहे.
सध्या या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे तसेच महामार्गावर सध्या प्रचंड वाहतूक असल्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात. अशावेळी रात्री-अपरात्री डॉक्टर नसल्याने गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये नांदगांव परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात येणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.