सावंतवाडी : कोटीच्या कोटी निधीची उड्डाणे करुन आता नव्याने पंचतारांकित हॉटेलचे स्वप्न दाखविण्यापेक्षा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदा गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पहिला सोडवावा सावंतवाडीतील रूग्णालयात आवश्यक असलेला औषध पुरवठा सुरळीत करावा असे जोरदार टीकास्त्र माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रविण भोसले यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केला आहे. दोन दिवसांपुर्वी मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघात काही दिवसात पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यात येणार आहे, असा दावा केला होता.त्यावरून भोसले यांनी समाचार घेतला. भोसले म्हणाले, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी मतदार संघातील जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे. खोटी स्वप्ने दाखवायची मंत्री दीपक केसरकरांची जुनी पद्धत आहे. आताही ते तीच पद्धत वापरून निवडणूक डोळ्यासमोर ठेवत घोषणांचा पाऊस पाडणार आहेत. नुकतीच सावंतवाडीत पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्याची त्यांनी घोषणा केली. मात्र आजपर्यंत केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले? असा सवाल भोसले यांनी केला.प्रत्येक घरात सेट टॉप बॉक्स, महिलांना स्वयंरोजगार, बेरोजगारांसाठी उद्योगधंदे, चष्म्याचा कारखाना तसेच सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येणार अशा कितीतरी कोटीची कोटी उड्डाणे घेणाऱ्या घोषणा यापूर्वी देखील केसरकारांनी केलेल्या असून सावंतवाडी मतदारसंघातील सुज्ञ मतदार त्या घोषणा आजही विसरलेल्या नाहीत. आता पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेल निर्माण करू या घोषणेचा निश्चितच येथील जनता स्वागत करेल. मात्र येथील सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत असून त्यांना गोळ्या, औषधे देखील पुरेसे प्रमाणात या शासनाकडून पुरविले जात नाही. अपघातग्रस्त रुग्णांना येथे पुरेश्या उपचार सुविधा नसल्यामुळे गोव्यात उपचारासाठी जावे लागते. हे गेली १५ वर्षे आमदार व आता मंत्री असलेल्या केसरकरांना दिसत नाही का? म्हणून उगाच कोटीची उड्डाणाची घोषणा करायच्या आणि येथील जनतेचा भ्रमनिरास करायचा, हाच उपक्रम त्यांनी गेल्या १५ वर्षात अवलंबला आहे, असाही टोला भोसले यांनी लगावला.
पंचतारांकित हॉटेल्स राहूदे गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर लक्ष द्या, प्रविण भोसले यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका
By अनंत खं.जाधव | Published: July 01, 2024 3:56 PM