कणकवली: मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांचे मानधन तत्काळ मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव यांच्याकडे केली आहे.मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्यांमध्ये एकाचवेळी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. ते सर्व्हेक्षण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत प्रगणकांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडले. या सर्व्हेक्षणासाठी मानधन देण्यात येईल याबाबतची कल्पना प्रशिक्षण सत्रांमध्ये देण्यात आली होती. मात्र, सर्व्हेक्षण होऊन जवळजवळ दोन महिने होत आले आहेत. मात्र,कोणतेही मानधन प्रगणकांना प्राप्त झालेले नाही.त्यामुळे या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालून प्रगणकांना त्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेतर्फे राजाध्यक्ष अनिल पलांडे, राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी केली आहे अशी माहीती संघटनेचे राज्य प्रतिनिधी अनंत राणे, जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, सचिव नंदकिशोर गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन तत्काळ द्या; महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी
By सुधीर राणे | Published: March 19, 2024 12:19 PM