आवाशी : खेडचे नूतन तहसीलदार अमोल कदम, महसूलचे नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांच्या संयुक्त पथकाने लोटे येथील औद्योगिक वसाहतीला अचानक भेट दिली. येथील रिव्हरसाईड इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीवर बेकायदेशीर उत्खनन केल्याचा ठपका ठेवत दंडाची नोटीस बजावून कारवाई केली. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली. यावेळी त्यांच्यासमवेत लवेलचे मंडल अधिकारी वैद्य, तलाठी जे. पी. पाटील, शिवचे डी. एस. ढगे व घाणेखुंटचे के. एन. मोहिते हे होते.लोटे औद्योगिक वसाहतीत अंतर्गत आवारात रोज नवनवीन बांधकामे सुरु असतात. रासायनिक कारखाने असल्याने आत काय चालले आहे, याची माहिती अनेकदा ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग यांना मिळत नसते. महसूल विभागाला याची माहिती दिली तर ते त्या ग्रामस्थाला तक्रार अर्ज द्या, मग पाहणी करतो, असे सांगतात. त्यामुळे अशी बांधकामे झाकली जातात. याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थही नाराज झाले होते.मात्र, खेड येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार कदम यांनी अशा प्रकारची पाहणी करुन केलेल्या कारवाईचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे. आजच्या त्यांच्या पाहणी दौऱ्यात मुंबई - गोवा महामार्गालगत असणाऱ्या रंगाचे उत्पादन करणारी रिव्हरसाईड इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीत बेकायदेशीर उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लवेलचे तलाठी पाटील, घाणेखुंटचे मोहिते व शिवचे ढगे यांनी त्या ठिकाणचे मोजमाप करून पंचयादी घालण्यास सांगितली. त्यानुसार तलाठी मोहिते यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित कंपनीत पाण्याचा साठा करण्याकरिता मारण्यात आलेल्या बेकायदेशीर टाकीचा पंचनाम्यात समावेश आहे. ही मापे महसूल व तहसीलदार यांच्याकडे सादर करुन नेमके किती ब्रास उत्खनन झाले व त्यास किती रकमेची दंडात्मक कारवाई लागेल, हे आताच सांगता येणार नसल्याचे सागितले.त्याचबरोबर या कंपनीचा काही भाग आवाशी व काही घाणेखुंट ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने दंडाबाबतची माहिती माझ्याकडे किंवा लवेल तलाठ्याकडे उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.या कंपनीसह पॉवर प्लँटच्या उभारणीनिमित्ताने चर्चेत आलेल्या येथील विनती आॅर्गेनिक (इं.) लि. या कंपनीलाही या पथकाने भेट दिली. मात्र, तेथे असणारा वाळू व खडीचा साठा हा अधिकृत पावत्यांसह असून, या पॉवर प्लँटचे काम करणारा गुजरातस्थित ठेकेदार याच्या मालकीचा आहे. त्यालाही त्या साठ्यांची पावत्या घेऊन तहसील कार्यालयात बालविण्यात आले असल्याचे मंडल अधिकारी वैद्य यांनी सांगितले. या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितले.याबाबत रिव्हरसाईडचे फॅक्टरी मॅनेजर दिनेश कदम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही, तर विनतीचे पी. आर. ओ. सचिन खेर यांनी या पथकाशी संपूर्ण औद्योगिक वसाहतीत पाहणी सुरु असताना त्यांनी आम्हालाही भेट दिली. मात्र, संबंधित ठेकेदार त्याच्या पावत्या त्यांना सादर करणार असल्याचे सांगितले.(वार्ताहर)मागणी : आता तरी कारवाई करा...खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात अनेक अनधिकृत कामे सुरु आहेत. महसूल यंत्रणेने आजवर केलेल्या डोळेझाकीमुळे या कामांना बिनबोभाट आणि मोकळे रान मिळाले आहे. नवीन तहसीलदार अमोल कदम यांनी तरी यात लक्ष घालावे आणि अशा कामांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.कारवाईचे स्वागततहसीलदार कदम यांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असून, त्यामुळे विविध कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
रिव्हरसाईड कंपनीला दंडाची नोटीस
By admin | Published: February 10, 2016 11:00 PM