रत्नागिरी : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा रुग्णालयात नोव्हेंबर २०१४ पासून प्रलंबित असलेल्या ६०० पेक्षा अधिक अपंगत्व दाखल्यांचा निपटारा त्वरित करण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे. या कामाकरिता एक महिन्यासाठी महिला आघाडीतर्फे ४ डाटा आॅपरेटर्स जिल्हा रुग्णालयाला पुरविले जाणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयाचे २ आॅपरेटर्स असे एकूण ६ जण येत्या महिनाभराच्या काळात अपंगत्व प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रलंबित कामाचा निपटारा करणार असल्याची माहिती सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, डॉ. अनुराधा लेले यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी आघाडीच्या पदाधिकारी पौर्णिमा सावंत, प्रिया साळवी, दिशा साळवी, मनीषा बामणे आदी उपस्थित होत्या. जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपूर्वी अपंगत्व दाखले तयार करण्यासाठी डाटा आॅपरेटर्स होते. मात्र, त्यानंतर ही पदेच रद्द करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयातील अन्य विभागाच्या एका कर्मचाऱ्याकडे हे काम आले. एका कर्मचाऱ्याला हे काम पेलवणारे नाही. तसेच आॅनलाईन अर्ज पध्दती असल्याने दिवसाला एक व्यक्ती २५पेक्षा अधिक अर्ज भरू शकत नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून अपंगत्व दाखल्यांसाठी गरजूंना सातत्याने फेऱ्या माराव्या लागत आहेत. ही समस्या लक्षात घेऊनच शासनाकडे डाटा आॅपरेटर्सच्या पदांसाठी मागणी केली जाणार आहे. परंतु राज्यभराची ही समस्या असल्याने त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास वेळ लागणार आहे. त्यासाठीचे निवेदन महिला आघाडीतर्फे शासनाला दिले जाणार आहे. मात्र, सध्या निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी मध्यम मार्ग अवलंबिला जाणार आहे. या चार डाटा आॅपेटर्सबाबत जिल्हा रुग्णालयाचे उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पराग पाथरे यांच्याशी चर्चा झाली आहे. २५ जानेवारीपासून हे चार आॅपरेटर्स जिल्हा रुग्णालयाला शिवसेना महिला आघाडीतर्फे दिले जाणार असून, त्यांचा पगारही महिला आघाडीच करणार आहे. या कामाचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार आहे, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रलंबित दाखल्यांचा निपटारा होणार
By admin | Published: January 19, 2015 11:21 PM