खारेपाटण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्याबरोबरच खारेपाटणमधील विकासकामाचे असणारे प्रमुख प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कणकवली, देवगड वैभववाडी विधानसभाप्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख बापू धुरी, शिवदूत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रतीक भिसे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नंदिनी पराडकर, कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार, खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत, कार्यकर्ते लियाकत काझी, शाहरुख काझी, बब्या खांडेकर, सचिन शिंदे आदी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.आमदार रवींद्र फाटक हे शनिवारी खारेपाटण येथील शिंदे गटाच्या शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेण्याकरिता व त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्यावतीने सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांना दिवाळी भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांचा खारेपाटण येथील पदाधिकारी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खारेपाटणमधील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी आमदार फाटक यांनी खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. तसेच खारेपाटण मधील प्रलंबित असलेली सर्व विकासकामे कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन ग्रामस्थ व पदाधिकारी यांना दिले.
खारेपाटणमधील प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी - रवींद्र फाटक
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 18, 2023 5:40 PM