कुडाळ : महामार्गाच्या बाजूस बांधण्यात आलेले गटार नियोजनबद्ध बांधले नसल्याने पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा तक्रारी कुडाळ तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशाप्रकारे महामार्गाची कामे करा, अशा सक्त सूचना महामार्ग प्रशासनाचे अधिकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार राऊत यांनी केल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कुडाळ तालुक्यात शिल्लक असलेले कामही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याकडे महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनीने विशेष लक्ष देत कामाला सुरुवात केली आहे.येथील काम पूर्ण करीत असतानाच महामार्गाच्या बाजूस बांधण्यात आलेल्या गटारांतून काही ठिकाणी पावसाचे पाणी जाणार नाही. त्यामुळे कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन याचा नाहक त्रास येथील जनतेला होणार असल्याबाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे वारंवार लक्ष वेधले होते.याबाबत कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितले तर त्यांनी व महामार्ग प्रशासनने दुर्लक्ष करीत केवळ काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिला होता. दरम्यान, सोमवारी पहिल्याच पावसात याचे परिणाम दिसून आले. महामार्गाच्या कडेला अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते.दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार राऊत, पालकमंत्री सामंत, आमदार नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महामार्गाच्या कडेला जेथे समस्या निर्माण झाल्या आहेत अशा वेताळ-बांबर्डे, पावशी, कुडाळ हॉटेल आरएसएन तसेच कुडाळ राज हॉटेल येथील गुढीपूर श्री नर्सरी, झाराप तिठा आणि इतर काही ठिकाणच्या मार्गांची पाहणी केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, राजू गवंडे, उद्योजक राजन नाईक, भाजपाचे निलेश तेंडुलकर, श्री नर्सरीचे अजित म्हाडेश्वर, सतीश कुडाळकर तसेच महामार्ग प्रशासनाचे जी. गौतम व इतर अधिकारी, कर्मचारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.रस्त्याची उंची वाढवून घ्या : राऊतकुडाळ आरएसइन हॉटेल ते वरंडेश्वर मंदिर येथील रस्त्याची उंची योग्य नाही. या ठिकाणी पाणी साचणार असे येथील नागरिकांनी सांगितले. राऊत यांनीही येथील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करीत रस्त्याची उंची योग्य नसून दीड मीटरने उंची वाढवा व रस्ता तयार करा, असे आदेश दिले.
कुडाळ शहरातील महामार्गावर करण्यात येणाऱ्या सर्कल संदर्भात माहिती देताना गौतम यांनी सांगितले की, हॉटेल आरएसएन येथे तीस मीटर अर्ध सर्कल असणार आहे तर राज हॉटेलकडे मुख्य सर्कल असणार आहे. कुडाळ येथील महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करा, असेही राऊत यांनी सांगितले.