चिपळूण : ‘आम्ही चिपळूणकर’ आणि डीबीजे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘चिपळूण : आज आणि उद्या’ या चर्चासत्रात अभ्यासपूर्ण विचारांचे मंथन झाले. शहरातील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सभागृहात दिवसभर चाललेल्या या विचार मंथनात ‘सक्षम कारभारासाठी लोकसहभाग हवा’, असा सूर उमटला. एका बाजूला विविध सत्ताधारी पक्षांनी शासनाने जाहीर केलेला विकास आराखाडाच रद्द करा, अशी मागणी लावून धरलेली असताना या चर्चेत शहराचा आराखडा तयार करण्यात लोकप्रतिनिधी मंडळाने दिरंगाई का केली? असा प्रश्न विचारात सर्वसामान्यांच्या सुप्त भूमिकेला व्यक्त केले. चर्चासत्राचे उद्घाटन चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांनी केले. प्रारंभीच्या सत्रात चिपळूणच्या पायाभूत समस्यांविषयी मांडणी करताना संजीव अणेराव यांनी शहरातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची दुर्दशा आकडेवारीसह स्पष्ट केली. बी. ए. आर. सी.च्या सहाय्याने सुरु करण्यात आलेल्या ‘निसर्गऋण प्रकल्पाची वासलात का लागली?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी अधोरेखित केला. अनेक वर्षात शहराच्या सांस्कृतिक गरजांची पूर्ती का केली गेली नाही? इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पुनर्बांधणीचा खेळखंडोबा का झाला? असे प्रश्न करत कलाकारांच्या या भूमीत कलाकार सहाय्य योजना सुरू करण्याची गरज सुहास बारटक्के यांनी व्यक्तकेली. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुल खेळांपेक्षा अन्य कार्यक्रमासाठी वापरले जाते, हा दोष या संकुलाच्या बांधणीचा आहे, असे रमाकांत सकपाळ यांनी नमूद केले. बाजारपेठेच्या समस्येविषयी शैलेश वरवाटकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शाहनवाझ शाह यांनी भाजी मंडई, मटण मार्केट यांची बांधणी लोकाभिमुख पद्धतीने झाली नसल्याने ही बांधकामे दीर्घकाळ सडत पडली आहेत, असे प्रतिपादन केले. ‘चिपळूणचे भौगोलिक - सामाजिक पर्यावरण’ या विषयावर विवेचन झाले. डीबीजे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जी. बी. राजे यांनी चिपळूणचे भौगोलिक व पर्यावरणीय सामर्थ्य सचित्र विषद करताना हे शहर म्हणजे दुसरे काश्मीर आहे, शहराच्या या विविधांगी ऊर्जेचा साकल्याने विचार करायला हवा. सभोवती पसरलेले डोंगर, मुबलक जलस्रोत, तळी यांचा सर्वांगाने विचार करायला हवा, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी पर्यावरणातील युवा अभ्यासक मल्हार इंदुलकर यांनी शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदी या नद्यांची दुर्दशा मांडताना या जलस्रोतांतील अधिवास आणि कष्टकरी मच्छिमार समाजाचा विचार आपण प्राधान्याने करायला हवा. नैसर्गिक आपत्तींला कसे सामोरे जावे, हे विषद करताना आपत्ती निसर्ग निर्माण करीत नाही, तर आपणच निर्माण करतो, हा मुद्दा माजी नगरसेवक प्रकाश काणे यांनी विषद केला. चिपळूणमधील सामाजिक एकोपा व्यक्त करताना डॉ. अल्ताफ सरगुरोह यांनी या शांतताप्रिय शहराचा नागरिक असल्याचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दात या शहराचे समृद्ध असे सामाजिक पर्यावरण विषद केले. यावेळी झालेल्या चर्चेतून अनेक सकारात्मक सूचना पुढे आल्या. सांडपाणी प्रक्रियेची तातडीची गरज असून, ही प्रक्रिया तीन-चार ठिकाणी करणे आवश्यक आहे, चिपळूण शहर बशीच्या आकाराचे असल्याने येथे भोवतालचे वायू प्रदूषण साचून राहाते. भोजनानंतरचे तिसरे सत्र चिपळूणच्या विकासाची दिशा या विषयावरचे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय रेडीज यांनी या शहराचे पूर्वापार व्यापारी पेठ म्हणून असलेले महत्व टिकविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. शकुंतला लढ्ढा यांनी शहराच्या विकासाचा विचार करताना व्यापक अर्थव्यवस्थेचे भान असणे आवश्यक आहे, असे मत मांडले. शहर नियोजन या विषयावर बोलताना मुकुंद काणे यांनी शहराचा विकास आराखडा नगरपालिकेने आजपर्यंत का तयार केला नाही? असा थेट प्रश्न विचारीत त्यामध्ये कोणाचे तरी हितसंबध लपलेले आहेत, ही बाब स्पष्ट केली. या सत्राचे सूत्रसंचालन राजन इंदुलकर यांनी केले. शेवटचे सत्र शहराच्या व्यवस्थापनात लोकांचा सहभाग, या विषयावरचे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. शांताराम बुरटे यांनी नगरसेवक हा लोकांचा आरसा असतो, त्यांना स्वत:च्या सेवकपदाची जाण असायला हवी. मात्र, आजचे नगरसेवक तसे नाहीत, अशा शब्दात सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली.ज्येष्ठ व्यावसायिक राम रेडीज यांनी नगरसेवक म्हणून आपल्याला आलेले अनुभव विषद केले, तर पत्रकार योगेश बांडागळे यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांची सध्याची दुरवस्था प्रखर शब्दात मांडली. आताच्या घटना दुरुस्तीत राज्यकारभारात नागरिकांचा सहभाग अपेक्षित धरलेला आहे. त्याचा अंमल व्हायला हवा, अशी भूमिका ऋजुता खरे यांनी यावेळी मांडली. या चर्चासत्राचा शेवट ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि चिपळूणचे सुपुत्र गजानन खातू यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. आज दिवसभर मी ही चर्चा ऐकली आणि त्यातून आजचे चिपळूण मला नव्याने समजले, असे म्हणताना नागरिकांनी स्वत: काहीही जबाबदारी न स्वीकारता लोकांनी आपल्या प्रतिनिधींकडे केवळ मागण्या मांडत राहाणे गैर आहे. त्यामुळे मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आपण लोकप्रतिनिधीना बहाल करतो, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ‘आम्ही चिपळूणकर’च्या ऋजुता खरे यांनी केले. (प्रतिनिधी)
सक्षम कारभारासाठी लोकसहभागच गरजेचा
By admin | Published: February 11, 2016 10:29 PM