कणकवली: उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. येथे येणाऱ्या प्रकल्पांना ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी विरोध करून एकप्रकारे ते प्रकल्प समुद्रात बुडविले. येथील तरुणांना रोजगारापासून मुकावे लागले. आता जनतेने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांचा पराभव करून त्यांनाच समुद्रात बुडवावे. तसेच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भुलथापाना जनतेने भुलू नये, असे आवाहन भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत उपस्थित होते.जठार म्हणाले, प्रत्येक प्रकल्पाला खासदार विनायक राऊत विरोध करतात. नवीन कुठलाही प्रकल्प आला की, ते आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला विश्वासात घ्या,असे म्हणतात. याचा अर्थ काय? रोजगार उपलब्ध नसल्याने तरुणांना बाहेर गावी जावे लागत असल्याने कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत. रिफायनरी प्रकल्प व्हावा,यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र, एकदा राऊत यांना विचारले, तुम्ही रिफायनरीचा अभ्यास केला का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको असेल तर आमचा त्याला विरोध राहील. आमदार राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगताहेत की, हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प करावा म्हणून मुख्यमंत्री असताना केंद्रशासनाला पत्र दिले आहे. मग फक्त राऊतांचाच त्याला विरोध का? असा प्रश्न प्रमोद जठार यांनी उपस्थित केला.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी,कोल्हापूर या भागातील काजू बीला २०० रुपये हमी भाव द्यावा, या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्याबाबतची बैठक सर्व मंत्र्यांच्या उवस्थितीत पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन शुल्क लक्षात घेवून सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी अशी आम्ही मागणी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या भूलथापाना जनतेने भुलू नये, प्रमोद जठार यांचे आवाहन
By सुधीर राणे | Published: February 02, 2024 4:29 PM