कणकवली : कणकवली नगरपंचायत उद्यानाची देखभाल व निगा राखण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कुठलीही देखभाल न करता नगरपंचायतीच्या पैशाची लूट करीत आहे. यानिमित्ताने नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येत आहे. असा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी केला आहे.विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या उपस्थितीत कणकवली शहरातील चार उद्यानांना मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. याबाबत कन्हैया पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. तसेच सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केले.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आम्ही उद्यानांची पाहणी केली त्यावेळी संबंधित ठेकेदाराने कोणतीही देखभाल वा साफसफाई केली नसल्याचे निदर्शनास आले. त्याचा पंचनामा नगरपंचायत प्रशासनाने केला आहे.त्या पार्श्वभूमीवर चार उद्यानांच्या देखभाल व साफसफाईसाठी प्रतिमहा ८० हजार रुपयेप्रमाणे सहा महिन्यांचे पाच लाख रुपये होतात. काम न करता ते पैसे घेऊन ठेकेदाराने नगरपंचायतीची फसवणूक केली आहे. कणकवली सत्ताधारी, अधिकारी व ठेकेदार संगमताने हा प्रकार करीत आहेत.
या उद्यानाची पाहणी करताना विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मुख्याधिकारी विनोद डवले, लेखापाल प्रियांका सोन्सुरकर, लिपिक सतीश कांबळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार असल्याचे उपस्थित नगरसेवकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.