तळेरे : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे येथील पूल वाय पिलरवर करण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करूनही याठिकाणी संपूर्ण भिंत उभारून बाजरपेठेचे दोन भाग करण्यात येत आहेत. यामुळे गावातील भौगोलिक परिस्थिती बदलते. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार असल्याने तळेरे येथे वाय पिलर उभारून पूल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
लोक आंदोलन करणार असल्याने या निवेदनाची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे तोंडी आश्वासन दिले. त्यामुळे तळेरे येथील जनआंदोलन ग्रामस्थांनी तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले. यावेळी गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व जमीनमालक उपस्थित होते.याचबरोबर चौपदरीकरण कामासंदर्भात १७ समस्यांचे निवेदन ग्रामस्थांनी यापूर्वी प्राधिकरणाला तसेच संबंधित ठेकेदाराला दिले आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर तळेरे ग्रामपंचायतीत महामार्ग प्राधिकरण अधिकारी, केसीसी ठेकेदार प्रतिनिधी व तळेरे गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ जमीन मालक यांच्यात झालेल्या सभेत ग्रामस्थांनी महामार्गाच्या चौपदरीकरण संदर्भातील तळेरे गावात निर्माण झालेल्या विविध समस्या मांडल्या.या चर्चेवेळी नायब तहसीलदार नाईक, शाखा अभियंता एस. डी. परब, डी. जी. कुमावत, कणकवलीचे सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी तळेकर, उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी सरपंच बापू डंबे, महामार्ग संघर्ष समिती अध्यक्ष राजू जठार, ग्रामसेवक युवराज बोराडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश माळवदे, राजेश जाधव तसेच महामार्ग ठेकेदार प्रतिनिधी द्विवेदी, पांडे, पोलीस निरीक्षक संजय धुमाळे, सागर खंडागळे, बापू खरात, अमोल राणे, पोलीस पाटील संजय बिळस्कर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्वासनयाठिकाणी झालेल्या चर्चेत महामार्ग प्राधिकरण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कणकवली महसूल विभागाचे नायब तहसीलदार नाईक व भुसंपादनचे अधिकारी परब यांनी प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तर काही मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिले.