कणकवली : सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी विविध योजना आणि त्यासाठी निधी जाहीर करून जनतेला फसवण्याचे काम करत आहेत. केवळ रस्ते, पूल यासारख्या मलई खाता येणाऱ्या कामाकडेच लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. तर, जनतेच्या आरोग्य सुविधेसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपरकर म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्य सुविधेसाठी आधारवड असणाऱ्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालय, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वीज प्रवाह विजवितरण कंपनीने थकबाकीमुळे खंडित केला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात केवळ ३ स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यातील एक गंभीर आजारी तर दुसरे मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. तर तिसरे पदव्युत्तर शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जनतेला लाखो रुपयांची बिले भरण्याची वेळ आली आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे.जनतेला आरोग्य सेवाच मिळत नसेल तर नुसता विकास काय उपयोगाचा आहे. रस्ते, इमारती, पूल यासाठी लोकप्रतिनिधी व नेत्यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत असेही उपरकर म्हणाले.
मलई खाता येणाऱ्या कामाकडेच लोकप्रतिनिधींचे लक्ष, परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 4:02 PM