सिंधुदुर्गनगरी : प्रवासी वाहतूक करणारे आराम बसेसचे काही चालक दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ तिठा येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले असून गेल्या २० दिवसांत दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ७ आरामबस चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी खासगी आरामबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची असते. काही बसेसचे चालक वाहने सुसाट चालवून काही तासातच मुंबईला पोहोचतात तर काही आराम बसेसचे चालक दारु पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघात घडून त्यात निष्पाप प्रवाशांचे बळी जातात. ही बाब समोर आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात खासगी आराम बसेसच्या वाहनचालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर वाहतूक शाखेचे दोन व कणकवली पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण चार कर्मचारी आहेत. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरमार्फत तपासणी करण्यात येत आहे. २१ आॅगस्टपासून स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टवर अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या २० दिवसांत ७ आराम बसेसच्या वाहनचालकांवर दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. दररोज ४० ते ५० आरामबसेसच्या दोन्ही वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात आहे. महामार्गावर असा प्रकार घडल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईही सुरुच राहणार आहे. - संजय साबळे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूकमहिन्याभरात ६0 चालकांवर कारवाईजिल्ह्यात महिनाभरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कसून तपासणी वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार इन्सुली येथे करण्यात आलेल्या तपासणीत १० लक्झरी बसेस चालक, आंबोली येथे १२ वाहनचालक आदी एकूण ६० वाहनचालकांवर दंडात्मक स्वरुपात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.
हुंबरठ येथे कायमस्वरूपी चेकपोस्ट
By admin | Published: August 11, 2015 11:34 PM