देवगड : पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छिमारी करण्याचा उद्देशाने देवगड काळोशी समुद्रात १५ वावामध्ये उभ्या असलेल्या गोवा येथील सेंट ॲन्थोनी या पर्ससीन नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास केली.मत्स्य व्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेने शनिवारी समुद्रात गस्त घालत असताना काळोशी समुद्रात १५ वावामध्ये पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छिमारी करण्याचा उद्देशाने उभ्या असलेल्या गोवा येथील ॲलेक्सो फर्नांडीस यांच्या मालकीच्या सेंट ॲन्थोनी या नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले. या नौकेवर पर्ससीन जाळे व जनरेटर सापडला. खलाशीवर्गाचा विमा नाही, महाराष्ट्र जलधी क्षेत्रात पर्ससीन मच्छीमारीस बंदी असताना बिगरपरवाना मच्छीमारी करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या गोवा येथील नौकेला गस्ती पथकाने पकडून देवगड बंदरात आणले असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.ही कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, सागर सुरक्षारक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल, अमित बांदकर, योगेश फाटक, लक्ष्मण लोके या टीमने केली.
देवगड समुद्रात पर्ससीन नौका पकडली, मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 6:31 PM