मालवण : पर्ससीन मासेमारी व पारंपरिक मच्छिमार यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. पर्ससीन मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांना शिवसेना पाठिंबा देत आहे; मात्र पर्ससीनबाबत शिवसेनेला स्पष्ट भूमिका घेणे अवघड जात आहे. मच्छिमारांच्या पाठीशी आहोत, असे सांगणाऱ्या भाजपने पारंपरिक मच्छिमारांच्या न्यायालयीन लढ्यात साथ द्यावी. तसेच भाजप व शिवसेनेनेही डॉ. सोमवंशी अहवालाबाबत भूमिका जाहीर करावी, असे स्पष्ट मत मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी व्यक्त केले आहे. मालवण भरड येथील हॉटेल ओयासिस येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पर्ससीनप्रश्नी शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार, पालकमंत्री स्पष्ट व ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत.डॉ. सोमवंशी अहवालाबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून तरतुदींचे कायद्यात रूपांतर करण्याची तयारी दर्शवलेल्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच आहे. मात्र, यापुढेही भाजपने ठोस भूमिका कायम घेऊन पारंपरिक मच्छिमारांना न्याय द्यावा. मत्स्योद्योग मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी भाजप-शिवसेनेने डॉ. सोमवंशी अहवालाबाबत भूमिका जाहीर करावी, असेही पराडकर म्हणाले. (प्रतिनिधी)सवाल पे सवाल...-रेडी (सिंधुदुर्ग) ते जयगड (रत्नागिरी) पर्यंत साडेबारा वाव क्षेत्र पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव असावे, असे समितीने सूचित केले आहे. त्याबाबत भाजपची भूमिका काय असणार आहे? सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतच हंगामी पद्धतीने पर्ससीन मासेमारीसाठी २६२ किंवा १८२ पर्ससीन परवाने द्यावेत म्हणजे महाराष्ट्रात असलेल्या पर्ससीन परवान्यात घट दर्शविली आहे. ते निम्म्याने कमी होणार आहेत का ? २०११ साली बाळ माने यांनी पर्ससीन मासेमारीविरोधात बाणकोट ते बांदा अशी सागरी यात्रा काढण्याचे जाहीर केले होते. त्याचे काय झाले? तसेच खासदार विनायक राऊत यांनी खासदार झाल्यावर पारंपरिक मच्छिमारांना कायद्याने संरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. या घोषणेला आज एक वर्ष झाले आहे, त्याचे काय झाले? असे अनेक सवाल पराडकर यांनी उपस्थित करत राज्य शासनाला ठोस भूमिका घेण्याबाबत आव्हान दिले आहे.
‘पर्ससीन’प्रश्नी सेना-भाजपने ठोस भूमिका जाहीर करावी
By admin | Published: October 15, 2015 12:09 AM