कसई दोडामार्ग : जिल्ह्यात शिवसेना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी माझी जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यामध्ये यश संपादन करणे, ही प्रमुख जबाबदारी असल्याने, जी व्यक्ती पक्षासाठी योगदान देऊ शकते, त्यांना पक्षाची प्रमुख पदे देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी दोडामार्ग येथे केले.तालुका महिला आघाडीची बैठक शिवसेनेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सावंत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेशप्रसाद गवस, संजय गवस, नगरसेवक लीना कुबल, रामदास देसाई, सुषमा मिरकर, विजय जाधव, गिरीष डिचोलकर, विनिता घाडी आदी उपस्थित होते.यावेळी सावंत म्हणाल्या, शिवसेना पक्षात काम करण्याची दखल घेतली जाते. त्यामुळे प्रत्येकाने काम करून आपली पात्रता सिद्ध करा. यापुढे पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी शाखाप्रमुख व कार्यकारिणी पुढील महिन्यापासून गावात जाऊन करण्यात येणार आहे. या पदावर काम करणाऱ्यांना संधी देणार, काम न करणाऱ्यांना संधी देणार नाही. शासनाच्या योजना गावोगावी पोहोचवा. सर्वसामान्यांची कामे करा. त्यांना आधार द्या. महिलांना संघटीत करा. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करा. अशी मदत कोणी विसरू शकत नाही. निवडणुकीच्यावेळी अशा महिला तुम्हाला नक्कीच मदत करणार. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांना रोजगार देण्यात येणार आहे. बचतगटांनी तयार केलेला माल विकत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. महिला दिन साजरा करताना मागील वर्षी आपली काय परिस्थिती होती आणि आता काय झाली, याचे आत्मचिंतन करावे. पक्षाच्या माध्यमातून महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षणे देऊन महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार देण्यात येणार आहेत. महिला आरक्षण असल्याने उमेदवार शोधून रणनीती आतापासून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सैनिकांनी आतापासून कामाला लागा. शिवसेना-भाजप पक्षामध्ये येणऱ्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही, हा निर्णय वरिष्ठांकडे राहील. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली, तरी चालेल. त्यामुळे सर्वांनी आतापासून तयारीला लागा, असे आवाहन सावंत यांनी केले. तालुक्यात प्रथमच महिला जिल्हाप्रमुख झाल्याने तालुका महिलांच्यावतीने सावंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
पक्षासाठी योगदान देणार त्यालाच पद
By admin | Published: March 06, 2016 11:10 PM