लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : घरात, हॉटेलात रंगीत मासे पाळणे आता केंद्र शासनाच्या नव्या धोरणानुसार जाचक ठरणार आहे. याशिवाय मत्स्यपालन तसेच रंगीत माशांची खरेदी-विक्री करणेही कायद्याच्या कक्षेत आले आहे. शोभिवंत मासे घरात फिशटँकमध्ये ठेवायचे झाल्यास मत्स्य विभागाचे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता रंगीत शोभिवंत माशांचा व्यवसाय करणारे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.देशासह सर्वत्र शोभिवंत माशांच्या व्यवसायाची आर्थिक उलाढाल वाढली आहे. अनेक माशांची अवैध खरेदी-विक्री होत असल्याने या व्यवसायातील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने ‘प्राणी अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१७’ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाकडे वरिष्ठ पातळीवरुन कोणत्याही सूचना अगर आदेश प्राप्त झाले नसल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. घरात किंवा कार्यालयात फिशटँक ठेवण्यासाठी मत्स्य विभागाच्या परवानगीसह फिशटँकमध्ये किती पाणी असावे, त्यात कोणत्या प्रकारचे किती मासे ठेवावेत याचीही नियमावली केली आहे. नवीन नियमात समुद्री मासे व समुद्रातील शोभिवंत माशांच्या प्रजननाला बंदी घातली असून हे मासे मत्स्यालयात ठेवण्यासाठी बंदी आहे.मासे विक्री दुकानात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञ सहाय्यक असणे आवश्यक आहे असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शोभिवंत मत्स्यपालन व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
‘फिशटँक’ कायद्याच्या कक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:35 PM