कुडाळ : आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभामंडप, फुलांची सजावट अशा आगळ््यावेगळ््या वातावरणात प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राऊळ महाराज मठ परिसर व पिंगुळीनगरी सज्ज झाली आहे. या उत्सवानिमित्त देश-विदेशातील अनेक भाविकांची पिंगुळीनगरीत वर्दळ सुरू झाली आहे.हा सोहळा १२, १३ व १४ मार्च रोजी पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त गेले वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या सोहळ््याची गेले काही दिवस तयारी सुरू करण्यात आली असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.या उत्सवानिमित्त मठ परिसर तसेच दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मठ परिसरात रंगीबेरंगी रांगोळीने हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. यासाठी भव्य असा सभामंडप उभारण्यात आला असून येथील परिसर विविध फुलांच्या आकर्षक मांडणीने सजविण्यात आला आहे.उत्सव कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. १२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गोव्यातील प्रसिद्ध दिंडी सम्राट बाबू गडेकर व त्यांच्या २०० सहकाऱ्यांसह दिंडीने आगमन व नंतर भजन, सायंकाळी एसके ग्रुप मुंबई यांचा बहारदार असा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.मुंबईसह गोव्यात सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपणया सोहळ््याचे थेट प्रक्षेपण १२, १३ व १४ मार्च रोजी मुंबई शहर व गोवा राज्यात करण्यात येणार अजून अनेक भक्तांना या सोहळ््याचा लाभ घरबसल्या घेता येणार असल्याची माहिती प. पू विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.
वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंगुळी म्हापसेकर तिठा समाधी मंदिर ते वडगणेश मंदिर या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. वाळू, खडी, चिरे व डंपर वाहनधारकांनी अन्य मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.