सुधीर राणे कणकवली : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला जोरदार सुरूवात झाली आहे. सध्या पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून, धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच नदी किनारी असलेल्या मार्गांवर पहाटे दाट धुक्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत असून धिम्या गतीने सुरु ठेवावी लागत आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा खाली येत असून किमान तापमान 21 ते 23 अंश तर कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे खर्या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी काहीसा उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे थंडी, ताप ,खोकला आदी साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना अडचणी येत आहेत . सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्यावरील दुभाजक, खड्डे, फलक, माती-दगड यांचा अडथळाही वाहन चालविताना होत असतो. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना समोरील रस्ता व वाहने निट दिसत नाहीत त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु ठेवावी लागते.स्वेटर तसेच उबदार कपडे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून, ग्राहकांची कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता विक्रेते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांना आवडतील व सहजरित्या वापरू शकतील असे कपडे उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, स्लिव्हलेस स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश आहे. तर तरुणांसाठी जॅकेट, झीपर, प्रिंटिंग मंकीकॅप, हँडग्लोज तसेच जाड कापड असलेले स्टायलिस्ट कपडे आदींची मागणी आहे.मुलीही या बाबतीत मागे नाहीत, लाईट रंगाच्या व झुबकेदार केसाळ असलेल्या लांब स्वेटरना अधिक पसंती देताना दिसत आहेत. थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या कपड्यांवर विशेष लक्ष दिले जाते. संपूर्ण अंग झाकेल असे उबदार कपडे ग्राहक खरेदी करत आहेत. यामध्ये विशेषत: लहान मुलांसाठी कार्टुनचे चित्र असलेली कानटोपीची चलती आहे. थंडीच्या दिवसात पायांना उब मिळावी म्हणून मोजेही खरेदी केले जात आहेत.सध्या ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातूनही थंडी हंगामासाठी कोणते कपडे खरेदी करावे याचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे ग्राहक थेट दुकानात गेले की, त्याच कपड्यांची मागणी करतात. काही ग्राहक आपल्याला शोभून दिसतील असेच हिवाळी कपडे खरेदी करतात.सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनेही आपापल्या वेबसाईटवर ग्राहकांना स्वेटर उपलब्ध करून दिले आहेत. पुरुष, स्त्रिया व लहान मुलांसाठी शॉपिंग वेबसाईटने ऑनलाईन स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्यामुळे ग्राहकाना घरबसल्या खरेदी करता येत असून त्यांचा त्रास वाचला आहे.शेकोट्यांबरोबर गप्पा रंगू लागल्या!सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र बोचरी थंडी लागत असून, पहाटे धुके पडत आहे. सकाळीच थंडीचा जोर अधिक असतो . त्यामुळे सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून तरुणाई गप्पांचे फड रंगवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्ती स्वेटर आणि कानटोपी घालून घरा बाहेर पडत आहेत.जत्रोत्सवाचा आनंद द्विगुणित !सिंधुदुर्गातील ग्रामदैवतांच्या यात्रा सध्या सुरु असून गुलाबी थंडीच्या साथीने रात्री द्शावतारी नाट्य प्रयोग रंगत आहेत. मालवणी खाजा, चहा, भजी अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत रसिक द्शावतारी नाटकांबरोबरच जत्रोत्सवाचा आनंद लुटताना दृष्टिस पड़त आहेत.
सिंधुदुर्गात गुलाबी थंडीला बहर ! दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:51 AM
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला जोरदार सुरूवात झाली आहे. सध्या पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून, धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच नदी किनारी असलेल्या मार्गांवर पहाटे दाट धुक्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत असून धिम्या गतीने सुरु ठेवावी लागत आहे.
ठळक मुद्देसिंधुदुर्गात गुलाबी थंडीला बहर ! दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम