बांदा : तेरेखोल नदीपात्रावरील बांदा -शेर्ले जोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या साकव कम पुलाचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. पुलाच्या मागणीसाठी गेली ५० वर्षे दशक्रोशीतील ग्रामस्थ प्रशासनाविरुद्ध लढा देत होते. पाईपलाईनच्या कामामुळे पुलाचे स्वप्न सत्यात उतरल्याची प्रतिक्रिया कामत यांनी दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोडामार्ग सासोलीतून वेंगुर्लेत जात आहे. सदर पाईपलाईन बांद्यातून महामार्गावरून शेर्ले कापईवाडीतून नेण्याचा संबंधित विभागाचा प्रयत्न होता.
आळवाडीमार्गे पाईपलाईन नेल्यास पुलाचा अतिरिक्त खर्च वाढण्याचे कारण पुढे करण्यात येत होते. संबंधित विभाग प्रत्येकवेळी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेर्ले पंचक्रोशी व बांदा ग्रामस्थांनी अखेर आमदार नीतेश राणे यांचे याप्रश्नी लक्ष वेधले.राणे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व अभियंता यांना एक वर्षापूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवसात घटनास्थळी आणून पुलाचे महत्त्व पटवून दिले. प्रसंगी आळवाडीमार्गे पाईपलाईनचा आराखडा बदलल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर जीवन प्राधिकरणने आळवाडीमार्गेच पाईपलाईन नेण्याचे मान्य केले होते.होडीच्या जीवघेण्या प्रवासातून होणार मुक्तताबांदा सरपंच अक्रम खान व शेर्ले सरपंच उदय धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सदर पूलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे.