ओरोस : कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी पूर्णपणे चाळण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ४ कोटी रुपये निधी दिला होता. यातून या रस्त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आली होती. ते पैसे नेमके कुठे गेले? असा सवाल वाहनचालकांतून विचारला जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना तर रस्ता कोठे आहे हे सापडत नाही एवढे खड्डे पडले आहेत.या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांच्या मागे बसलेल्या व्यक्ती या खड्ड्यांत पडून अपघातही झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कसाल-मालवण हा राज्य महामार्ग आंगणेवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने डांबरीकरण केला जाईल, असे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियोजनाचा झालेल्या बैठकीत सांगितले होते. तसेच या राज्य महामार्गासाठी ४ कोटी रुपये खर्च होणार असून हा रस्ता येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारे तयार होईल असे सांगितले होते.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी एका ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, या ठेकेदाराने रस्त्याला फक्त थोड्या-थोड्या अंतरावर मलमपट्टी केली आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरून जात असताना वाहनचालकांना नेमका डांबरीकरण केलेला रस्ता कोठे आहे हे शोधूनही सापडत नाही.
मलमपट्टी करून फक्त हा रस्ता तयार करण्यात आल्याचे दाखविण्यात आले व चार कोटी रुपये पाण्यातही गेले. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता तयार केला अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.कसाल, बाजारपेठ रोड, शिवाजी महाराज चौक, पडव दरम्यान डोंगरेवाडी वळणावर तसेच आंब्याचे गाळू, रानबांबुळी येथील परिसरात तर वाहनधारकांना डांबरी रस्ता शोधूनही सापडत नाही. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांनी चाळण झाल्याने या रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद आहे.आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनसर्वसामान्यांच्या खिशातून कर स्वरुपात मिळणारा शासन निधी भ्रष्ट अधिकारी व मुजोर कंत्राटदार यांच्यामुळे वाया जात आहे. हे जनतेचे दुर्दैव आहे. येत्या आठ दिवसांत महामार्गाची सुधारणा न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची भूमिका घेईल, अशी प्रतिक्रिया मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.