सिंधुदुर्गनगरी : अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्यामधील मौजे आखवणे, भोम, नागपवाडी या गावातील काही भाग बुडीत क्षेत्रात गेला असून, बुडीत क्षेत्रात गेलेल्या लोकांचे पुनर्वसन मौजे मांगवली, कुसूर व कुंभारवाडी या वैभववाडी तालुक्यातील गावामध्ये करण्यात आले. नवीन गांवठाणला आखवणे-भोम-नागपवाडी (पुनर्वसन गांवठाण) हे महसुली गाव निर्माण करुन, त्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.मौजे आखवणे, भोम व नागपवाडी येथील पुनर्वसीत लोकांचे पुनर्वसन मांगवली, कुसूर व कुंभारवाडी या ठिकाणी करण्यात आले. नवीन गांवठाणला आखवणे, भोम येथील सरपंच व पुनर्वसीत लोकांनी ठरावानुसार नवीन गांवठाणची मागणी केली होती. त्या ठरावला जिल्हाधिकारी पाढरपट्टे यांनी दि. 11 डिसेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार नवीन महसुली गांव निर्माण करुन, त्याला मान्यता दिली आहे.
याबाबत जनेतकडून काही हरकती किंवा सूचना करावयाची असल्यास, त्यांनी गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी लेखी स्वरुपात तहसिलदार वैभववाडी किंवा उपविभागीय अधिकारी कणकवली यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येथील. वरील तारीखेनंतर हरकती किंवा सूचनांचा विचार केला जाणार नाही याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.