कणकवली : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात १ नोव्हेंबरपासुन प्लास्टिक बंदची कडक अंमलबजावणी करणार असल्याची भुमिका मुख्याधिकारी मनोज उकीर्डे यांनी जाहीर केली आहे. यानंतर कणकवलीतील व्यापाऱ्यांनी पटवर्धन चौक येथुन नगरपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढत मुख्याधिकाऱ्यांशी भेट घेवुन निवेदन सादर केले.यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी आणि व्यापारी यांच्यात जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. शासन निर्णया प्रमाणे १ नोव्हेंबरपासुन कणकवली शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले. तसेच असा मोर्चा काढण्यापेक्षा शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक बंदीस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अन्यथा व्यवसाय नोंदणी रद्द करण्यात येईल. तसेच प्लास्टिक मिळाल्यास ५ हजार रुपयाचा दंड करण्यात येईल, असा इशाराही दिला.
कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर बुधवारी रात्री श्री काशिविश्वेश्वर मंदिरात विशाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेवुन प्लास्टिक बंदीवर तोडगा काढण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अप्पासाहेब पटवर्धन चौक येथुन व्यापाऱ्यानी बाजारपेठ मार्गे नगरपंचायतपर्यंत रॅली काढली.या रॅलीत व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष विशाल कामत, जिल्हा सचिव निलेश धडाम, महेश नार्वेकर, राजन पारकर, मंदार आळवे, राजेश राजाध्यक्ष, नगरसेवक महेंद्र सांबरेकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शशिकांत राणे, दिनेश नार्वेकर, मंदार आळवे, अमित सापळे, चेतन अंधारी, निवृत्ती धडाम, रमाकांत काणेकर, राजु गवाणकर, प्रशांत अंधारी, विलास खानोलकर, शेखर गणपत्ये, भाऊ काणेकर, प्रकाश मुसळे, आनंद कोदे, रमाकांत डेगवेकर, किशोर अंधारी, राजु वाळके, हरिष उचले, पटेल, प्रभु आदी व्यापारी सहभागी झाले होते.कणकवली नगरपंचायत हद्दीत शासनाच्या निर्देशानुसार १०० टक्के प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कणकवली शहरात व्यापाऱ्यांनी कॅरीबॅग विक्री बंद करावी. ज्याठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या विकल्या जातील. त्या पिशव्या २ ग्रॅम वजनाच्या असल्या पाहीजेत. त्या पिशव्यांवर किंमत व स्टॅम्प, दिनाक असला पाहीजे. त्या पिशवीची नोंद तुमच्या रजिस्टरला असली पाहीजे. संबंधीत पिशवी ग्राहकाला दिल्यानंतर ती रिसायकलींग करण्यासाठी परत घेतली पाहीजे. व्यापाऱ्यांनी या सर्व बंधनकारक अटींची अंमलबजावणी करुनच व्यवसाय केला पाहीजे.शहरात पर्यावरणपुरक व्यवसाय करण्यास आमचा कोणताही विरोध नाही. या विरोधात कारवाई करण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली असुन प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासुन होईल अशी भुमिका व्यापाऱ्यांसमोर मुख्याधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीबाबत माहीतीसाठी कार्यशाळा घेण्याची मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी पथकासह उपस्थित होते. दंगल नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्याशी व्यापाऱ्यानी चर्चा केली. यावेळी कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, निलेश धडाम, महेश नार्वेकर, राजन पारकर, रुपेश नार्वेकर, राजा राजाध्यक्ष, राजु गवाणकर उपस्थित होते.
व्यापारी-मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी!व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत सरसकट बंदी प्लास्टिकवर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नेमकी प्लास्टिकबंदी म्हणजे काय आहे? याची माहीती घेण्यासाठी आपल्याकडे आलो तेव्हा तुम्ही आम्हाला चोर समजता? तुम्ही आमच्या व्यथा समजुन न घेता पोलीस बंदोबस्त का मागविलात? पोलीस कशासाठी पाहीजेत? त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी संतप्त होत तुम्ही कायदा शिकविण्याची गरज नाही? तुम्ही मोर्चा काढणार याची कुठलीही कल्पना आम्हाला दिलेली नाही? किंवा पत्रही नगरपंचायतला प्राप्त नाही? मी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बसलो आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासुन प्लास्टिक बंदी होईल. त्यादृष्टीने नगरपंचायत प्रशासन काम करत आहे. या मुद्यावर व्यापारी आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये काही वेळ खडाजंगी झाली.त्यानंतर या मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या भुमिकेवर व्यापारी मंदार आळवे यांनी आक्षेप घेत तुम्ही द्वेषाने बोलु नका? आम्हाला यावर काय तो उपाय सुचवा? किंवा कार्यशाळा घेवुन आम्हाला मार्गदर्शन करा. त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करतो असे सांगितले. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तुमच्याकडे जमा असलेले प्लास्टिक नगरपंचायतकडे जमा करा त्यावर प्रक्रिया आम्ही करु. भविष्यात त्या प्लास्टिकपासुन शहरातील रस्ते बनविता येतील. तसेच शहरातील प्लास्टिक बंदी संदर्भात काही प्राधिकृत प्रतिनिधी करणार आहोत. त्यात व्यापारी संघटनेने चार नावे सुचवावीत. भविष्यात कणकवली बाजारपेठेत झालेले वाढीव अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असेही मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी स्पष्ट केले.दुसऱ्या दालनात चर्चा करण्यात नकार !कणकवलीतील व्यापारी मुख्याधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर नगराध्यक्ष दालन किंवा सभागृहात नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी असे अपेक्षा होती. मात्र पहिल्यांदा प्रवेशद्वारावर पोलीसांनी व्यापाऱ्यांना अडवत फक्त शिष्टमंडळाने जाण्याची विनंती केली. त्यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी नगराध्यक्ष दालनात समिर नलावडे यांची भेट घेवुन वरील सभागृहात व्यापाऱ्यांची संयुक्त चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावर नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी आपले दालन सोडुन बाहेर कुठल्याही दालनात चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आपली भुमिका मांडली. तसेच निवेदन दिले.