सिंधुदुर्गनगरी : स्वच्छता मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली. पश्चिम भारतात व राज्यात पहिला जिल्हा हागणदारीमुक्त होण्यात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे असे सांगतानाच जिल्हा हागणदारीमुक्तीत सातत्य राखणार असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान राबविणार असल्याचे द्वयींनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल उपस्थित होते.जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधून ४२९ ग्रामपंचायती टप्पा १ अंतर्गत हागणदारीमुक्त झाल्या आहेत तर दोडामार्ग तालुक्यातील बोडण व वैभववाडी तालुक्यातील आखवणे या दोन ग्रामपंचायती प्रकल्पबाधीत असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ४८ हजार एवढी लोकसंख्या असून त्यात १ लाख ८४ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ४४५ एवढी वैयक्तिक शौचालये तर १५९५ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने सिंधुदुर्गात १०० टक्के कुटुंबे शौचालयाचा वापर करतात. सिंधुदुर्गातील जनता स्वच्छतेबाबत जागृत असल्याचे सांगत लोकांचे अभिनंदनही मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हा हागणदारीमुक्तीच्या शर्यतीत सिंधुुदुर्गाबरोबर सोलापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व ठाणे हे जिल्हे होते. मात्र या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर हागणदारीमुक्त जाहीर झाला असला तरी राज्यस्तरावर यावर मूल्यमापन करून जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने प्लास्टिकमुक्ती अभियान यशस्वी करत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक आदर्श निर्माण केला असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भविष्यात प्लास्टिकमुक्ती
By admin | Published: March 30, 2016 10:37 PM