नांदगाव : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच भविष्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सूदन बांदिवडेकर यांनी केले. ते नांदगाव केंद्रशाळा नं. १ मध्ये आयोजित बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूदन बांदिवडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर संतोष कानडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.व्यासपीठावर सरपंच संजय पाटील, पंचायत समिती सदस्या भाग्यलक्ष्मी साटम, केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, रवींद्र तेली, संतोष कानडे, मुख्याध्यापक सुहास सावंत, शशी तोरसकर, नांदगाव ग्रामसेवक भाट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी बिडये, सुशांत चव्हाण उपस्थित होते. यावेळी सूदन बांदिवडेकर म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशाप्रकारच्या विविध स्तरावर स्पर्धा आयोजित करणारी सिंधुुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रातील एकमेव आहे. अशा स्पर्धांमधूनच भविष्यात मोठे खेळाडू तयार होतील. भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात आपल्याकडे जिद्द ठेवायला पाहिजे. मी माझ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविणारच अशी प्रगल्भ इच्छा असली पाहिजे. कष्ट आणि मेहनत केलात तर अशा स्पर्धांमधून भविष्यातील खेळाडू निर्माण होतील. यावेळी संतोष कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीकांत टिपुगडे यांनी केले. प्रास्ताविक अनघा चिपळूणकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी मानले. (वार्ताहर)या स्पर्धा दोन दिवस चालणार असून यात खो-खो, कबड्डी, ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, उंचउडी, समूहगीत, समूहनृत्य, रिले व ज्ञानी मी होणार या स्पर्धा होतील. यात नांदगाव केंद्रातील शाळा भाग घेतील. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रशालेच्या शिक्षिका स्नेहल राणे यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
By admin | Published: December 15, 2014 7:48 PM