सिध्देश आचरेकर -- मालवण जिल्ह्यात यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रवेशोत्सावा’पासून विविध वादातीत विषय घडत आहेत. नुकतीच सावंतवाडीच्या मिलाग्रीस प्राथमिक शाळेतील दिनेश खोत या शिक्षकांच्या बदली प्रकरणावरून उठलेले रान शमले असतानाच मालवण तालुक्यात ११९ वर्षाची परंपरा असलेल्या भंडारी हायस्कूलला ‘सांडपाण्या’च्या समस्येने वाद निर्माण केला आहे. प्रशालेच्या लगतच्या वस्तीतील सांडपाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. गेली २० वर्षे सांडपाण्याने हायस्कूलला ग्रासले आहे. याबाबत पालिका तसेच पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही याची दखल घेतली नाही. सांडपाण्याबाबत वर्तमानपत्रातून बातम्या येताच पालिका प्रशासनाने नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १९९६ पासून सांडपाणीप्रश्नी पाठपुरवा करणाऱ्या भंडारी हायस्कूल येथे पालिकेने कोणतीही कार्यवाही न केल्याने तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी पालिका प्रशासन खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे. मालवण शहरातील भंडारी एजुकेशन सोसायटीचे भंडारी हायस्कूल ११९ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. भंडारी हायस्कूललगत असलेल्या लोकवस्तीतील पाणी, सांडपाणी प्रशालेच्या आवारात सोडले जाते, इतकेच काय तर कचऱ्याचे ढीगही तीन ठिकाणी लोकवस्तीतील नागरिकांनी टाकले असल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. गेले काही दिवस सांडपाणी विषयावरून भंडारी हायस्कूलने आवाज उठविला आहे. लगतच्या लोकवस्तीतील सांडपाणी तसेच सार्वजनिक शौचालयाचे पाणी भंडारी हायस्कूलच्या मैदानात ‘पाट’ काढून सोडण्यात आले आहे. हे सांडपाणी दुर्गंधीयुक्त असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाने पालिकेशी पत्रव्यवहार केला असून पालिकेकडून आश्चर्यकारक उत्तर मिळाले आहे. भंडारी हायस्कूल येथे पाटातून सोडण्यात आलेले पावसाचे पाणी असून हे नैसर्गिक स्त्रोत असल्याचाही खुलासा लोकप्रतिनिधींच्या उपस्थित केला आहे. भंडारी हायस्कूल पालिकेवर खोटे आरोप करून सरकारी कामात अडथळे आणत असल्याचे सांगितले आहे. याला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दुजोरा देताना पालिका कर्मचाऱ्यांना दोषी धरू नये. पालिकेला शाळा व्यवस्थापनाकडून चुकीच्या पद्धतीने टार्गेट केले जात आहे, असा आरोपही आचरेकर यांनी केला आहे. तर तेथील लोकवस्तीतील नागरिकांनीही तातडीची बैठक घेत पालिकेच्यावतीने सोडण्यात आलेले हे सांडपाणी नसल्याचे सांगत पावसाचे पाणी होते, वाडीत पाणी तुंबल्याने नागरिकांनी केलेल्या सूचनेनुसार पालिका कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भंडारी हायस्कूल लोकवस्तीची बदनामी करत असल्याचे प्रसिद्धापत्रकातून म्हटले आहे. शहरात पावसाळ्यात साथरोग पसरण्याचे मुख्य कारण हे सांडपाणी आहे. गतवर्षी भंडारी हायस्कूलमधील एका शाळकरी मुलगा मलेरियासारख्या आजाराला बळी पडत जीव गमवावा लागला. त्यामुळे सांडपाणी निचरा होणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे संस्थासंचालक या साऱ्या प्रकाराला वैतागले असून न्यायासाठी आता न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पालिका आणि संस्था प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. ‘भंडारी’चा १९९६ पासून पाठपुरावादरम्यान, लगतच्या वस्तीतील पाणी-सांडपाणी हायस्कूलच्या आवारात येत असल्याने यावर पालिकेकडून उपयोजना केल्या जाव्यात यासाठी भंडारी हायस्कूल प्रशासनाकडून १९९६ पासून पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आले असल्याची कागदपत्रे ‘लोकमत’च्या हाती लागली आहेत. याबाबत पालिकेकडून १२ वर्षांनी म्हणजेच २००८ साली बंदिस्त गटार योजनेच्या कामासाठी भंडारी हायस्कूलकडे परवानगी मागण्यात आली होती. हायस्कूलने परवानगी दिली असताना आजतागायत पालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे प्राप्त कागदपत्रांवरून समजते. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी नेमकी वस्तुस्थिती जाणून कायमस्वरूपी उपयोजना करण्यासाठी पालिकेत आवाज उठवून पुन्हा तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. कारण एखाद्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या आवारात खुलेआम पाट काढून त्यांच्याच जागेत पाणी सोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहेत. शिवाय ज्या मैदानात सांडपाणी सोडण्यात आले आहे तेथे प्राथमिक शाळेचे वर्ग असल्याने लोकप्रतिनिधीनी गांभिर्याने पाहणे आवश्यक आहे.सांडपाणीप्रश्नी शहरातील लोकप्रतिनिधी गप्प का ?शाळा परिसरात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शाळा परिसरातील मैदानात अक्षरक्ष: काळ्या रंगाचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ते थेट शाळेच्या प्रशस्त मैदानावर पसरले आहे. एकीकडे पालिका पावसाचे पाणी असल्याचे सांगत असताना दुसरीकडे शहरातील एकही लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. भंडारी हायस्कूलच्या मागील बाजूस प्रत्यक्ष पाहणी केल्यास ते पाणी सांडपाणी आहे की नाही ते समजू शकणार आहे तसेच त्याला दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे. आगामी काळात पालिका निवडणूक येत असल्याने मतांच्या राजकारणात लोकप्रतिनिधी नागरिकांच्या बाजूने ठाम उभे आहेत. मात्र राजकारणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सांडपाणी निचरा होण्यासाठी शहरातील नगरसेवक गप्प का असल्याचे सवाल उपस्थित होत आहे.
पालिका विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळतेय?
By admin | Published: June 27, 2016 11:25 PM