खेड : खेड ताुलक्यातील देवाचे डोंगर गावच्या धनगरवाडीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जानेवारीपासून येथे पाणी मिळत नाही. मात्र, गेले दोन महिने ५ किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्याचे काम सुरू होते. आता तेही आटले. पाणी आणायचे कुठून हाच प्रश्न या लोकांना पडला असून, पाणीपुरवठयाकरिता येथील पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ, येथील ग्रामस्थांनी २३ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे़ खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे अंतर २० किलोमीटर आहे.़ धनगरवाडी वगळता या डोंगरावर कोणतीही वस्ती नाही़ खेड, दापोली, मंंडणगड आणि पोलादपूर या चार तालुक्याच्या सीमेवर डोंगरद-यांमध्ये हे गाव अर्थात ही वाडी असली आहे.़ वर्षोनुवर्षे ही वाडी दुर्लक्षित राहिली आहे. सातत्याने येथे पाणीटंचाई आहे.़ या गावात जाण्यासाठी रामदास कदमांनी रस्तादेखील तयार केला आहे. मात्र, त्यानंतर या रस्त्यावर डांबर टाकली नाही़ त्यानंतर, या रस्त्याकडे कोणीही ढुकूंनही पाहिले नाही़ आता या रस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा भराव येऊन पडला आहे.़ यामुळे वाहनाने ये-जा करण्यासाठी चांगला मार्ग नाही. गावाकडे जाण्यासाठीच्या वाटेवर डोंगर असल्याने आणि रस्तादेखील चांगला नसल्याने प्रशासनाचा पाण्याचा टँकरदेखील या वाडीत जात नाही़ एस. टी.ची सुविधादेखील नाही. शिवकालीन कालखंडात वसलेल्या अनेक वस्त्यांपैकी धनगर समाजाची ही वस्ती. वाडीमध्ये मोजकी घरे आहेत. दुग्ध व्यवसाय हाच जगण्याचा मोठा आधार आहे़ ५ किलोमीटर पायपीट करत येथील मुलांना तुळशी येथील शाळेत जावे लागत आहे़ येथील लोकांना गावाजवळ कोणतेही जलस्रोत नसल्याने, तिथून बरेच अंतर कापून जामगे गावातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे़ तेही स्वत:च्या वाहनातूऩ लोकांची पायपीट सध्या प्रशासनालादेखील पाहवेनाशी झाली आहे. पण, विंधनविहीरी पाडण्यासाठी वाहने या वस्तीमध्ये नेणे शक्य नसल्याने, ती ही सोय करू शकत नसल्याची खंत काही लोकप्रतिनिधींनी बोलून दाखवली आहे़ मात्र, असे असूनदेखील धनगरवाडीतील या लोकांना पाण्यावाचून तडफडावे लागत असल्याने प्रशासनाने यातून काहीतरी मार्ग काढावा, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तुळशी देवाचा डोंगर ग्रामस्थांची दुर्दशा
By admin | Published: February 13, 2015 10:20 PM