वैभववाडी : गेल्या फेब्रुवारीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करून पसार झालेल्या संशयित आरोपीला वैभववाडीपोलिसांनी तब्बल १० महिन्यांनी अटक केली आहे. रोहन शेट्टी (३२, रा. कोपरी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. त्या महिलेने ठाणे पोलिसांत तक्रार नोंदविली होती. संशयितास कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०२० रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील एस-१२ या डब्यातून एक महिला मुरडेश्वर (कर्नाटक) ते मुंबई असा प्रवास करीत होती. त्या महिलेच्या आसनानजीकच एक पुरुष प्रवासी प्रवास करीत होता. ही गाडी नांदगाव ते वैभववाडी जात असताना त्या महिलेचा विनयभंग करून तो पुरुष पसार झाला.
रात्रीची वेळ असल्यामुळे त्या महिलेने मुंबईत २५ फेब्रुवारीला पोहोचल्यानंतर यासंदर्भात ठाणे पोलीस ठाण्यात त्या संशयित प्रवाशाविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदविली. मात्र, हा प्रकार वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे हा गुन्हा तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. सहायक उपनिरीक्षक रवींद्र अडूळकर, पोलीस नाईक अभिजित तावडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे हे २४ डिसेंबरला मुंबईला पोहोचले. त्यांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जात तो तिथे राहतो याची खात्री केली. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, संशयितास घेऊन वैभववाडी पोलीस शुक्रवारी (दि. २५) रात्री उशिरा वैभववाडीत दाखल झाले.संशयिताला अटक करून कणकवली न्यायालयात शनिवारी हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार संगीता अडुळकर करीत आहेत.रत्नागिरी रेल्वे कार्यालयाकडून माहितीपोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलिसांनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाकडून माहिती गोळा केली. तो प्रवासी रोहन शेट्टी नामक असून, तो ठाणे कोपरी येथे राहत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासांत निष्पण्ण झाले.