वेंगुर्ले : पासपोर्ट काढण्यासाठी पोलीस ठाण्याचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्यासाठी लाच घेताना वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे हवालदार सूरज बाबासो पाटील (वय २७) याला वेंगुर्ले शहरात भर रस्त्यावर १५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. वेंगुर्ले- माणिकचौक येथील प्रथमेश उमेश शिरसाट (वय २५) याचे पासपोर्ट पोलीस पडताळणीचे प्रकरण वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आले होते. त्यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे गोपनीय दप्तराचे कामकाज सूरज बाबासो पाटील हा पाहत होता. त्याने व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्याकरिता शिरसाट याच्याकडे १५०० रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात शिरसाट याने १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत खात्याच्या पथकाने सापळा रचून शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील हॉस्पिटल नाकानजीकच्या मनीषा कोल्ड्रिंक या दुकानासमोर सूरज पाटील याला लाच घेताना रंगेहात पकडले. पाटील याला रविवार, २१ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईत सहभागी पथकात पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक मोतिराम वसावे, सहायक पोलीस उपनिरीक्षक एल. डी. राणे, पोलीस हवालदार बुधाजी कोरगावकर, विलास कुंभार, मकसुद पिरजादे, पोलीस नाईक कैतान फर्नांडिस, पोलीस कॉन्स्टेबल महेश जळवी, आशिष जामदार, सुमित देवळेकर, प्रसाद कामत यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक
By admin | Published: December 20, 2014 11:26 PM