श्रीकांत चाळके- खेड --गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणात दाखल झाले आहेत. केवळ दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, भाविक गणरायाचे स्वागत करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. खेड तालुक्यात १५ सार्वजनिक आणि १२८८० खासगी गणरायांसह १२८९५ गणरायांचे आगमन होणार आहे. या गणरायांचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. या गणेशभक्तांच्या सुरक्षेकामी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि होमगार्डबरोबरच जादा पोलीस कुमक मागवण्यात येणार असून, जादा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत गणरायांची संख्यादेखील वाढली आहे. दीड दिवसाचे आणि ५ दिवसाचे गणेशोत्सव काही प्रमाणात वाढले असून, यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यानची आरास सुरेख करण्याच्या दृष्टीने गणेशभक्तांंमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. तालुक्यातील १२८९५ गणरायांमध्ये दीड दिवसाचे ८८२, पाच दिवसांचे ९९९४, तर अनंत चतुर्दशीचे १९८७ गणेशोत्सव आहेत. खेड एस. टी. बसस्थानकातील दीड दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सववगळता उर्वरित १४ गणेशोत्सव सार्वत्रिक स्वरूपाचे असून, ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे आहेत. १७ सप्टेंबरला श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. सलग दीड महिना पावसाने मारलेली दडी आणि जागतिक मंदी तसेच आकाशाला भिडणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गेले ६ महिने येथील जनतेसह व्यापाऱ्यांवर आर्थिक गंडांतर आले आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. तरीही या सर्वांवर मात करीत गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्याचा निर्णय आता गणेशभक्तांनी घेतला आहे. गणरायाच्या मखराभोवती तसेच आजुबाजुला करावयाच्या आरासकरिता आवश्यक असलेले परिपूर्ण साहित्य आता बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. विविध आकर्षक रंगांचे मखर, शामियाना, सूर्यप्रभा मुकुट, विविध फेटे, पगड्या, उपरणे यांच्यासह डायमंडसारख्या विविध वेशभूषेवर उठून दिसतील, अशी रंगसफेदी बाजारात उपलब्ध झाली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यामुळे बाजारपेठ फुलून गेली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी दुकाने सजली असून, विविधांगी लाईटस्देखील आले आहेत. सायंकाळच्या वेळी दुकानांमधून होणाऱ्या रोषणाईमुळे दुकाने उजळून निघत आहेत. गणेशभक्तांनी आता खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.++शांतता राखण्याचे आवाहनतालुक्यात प्रतिवर्षाप्रमाणे गणेशोत्सव शांततेत आणि आनंदाने साजरा करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी खेड येथे आयोजित बैठकीत सांगितले. जनतेला केले आहे. गणेशोत्सवात अनेकजण गावाकडे येत आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. गणेशोत्सवात या वाहतुकीला आपणच बंधने घातली पाहिजेत. तसेच गणेशोत्सवामध्ये संयम आणि शांतता राखणे हे जनतेचे काम असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले. गणेशोत्सव संपेपर्यंत मतभेद आणि संघर्ष बाजुला ठेवणे आपल्या हिताचे आहे़ आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे वर्तन करू नका. रात्रीच्या वेळेस लाऊड्स्पीकरचा आवाज कमी करणे आवश्यक असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही बंधने पाळावीत, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे़ यावेळी पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, तहसीलदार रवींद्र वाळके, प्रांताधिकारी जयकृष्ण फड आदी उपस्थित होते. बाजारपेठ सजलीतालुक्यात १५ सार्वजनिक गणपती.खासगी १२८८० गणपतींचे होणार आगमन.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची बैठक.आरासासाठी गणेशभक्तांमध्ये चढाओढ़महागाईमुळे गेल्या ६ महिन्यात जनतेसह व्यापाऱ्यांवर आर्थिक गंडांतर.बाजारपेठांमध्ये विविध वस्तंूची रेलचेल.जादा पोलिसांची कुमक.
उत्सवासाठी पोलिसांची जादा कुमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2015 9:18 PM