कणकवली : कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक नाकाबंदी केली. रात्री ११ वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. मात्र, गाडीत काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी तसेच अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी मी याच जिल्ह्यातील असून माझी गाडी का तपासता? असा प्रश्न पोलिसांना विचारला. तर पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दैनंदिन तपासणी असल्याचे सांगितले. याशिवाय, आम्ही सर्वच गाड्यांची तपासणी करीत असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर यांच्याकडून २ लाख २९ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने कणकवली शहरातील लॉजमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. बोरकर यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर (एम .एच. ०३ बी. जे. ४१४२) या गाडीच्या डिकीत तपासणी केली असता २ लाखांची रोकड सापडली. तर बोरकर यांच्याकडील बॅगेत रोख २९ हजार पाचशे रुपये मिळाले.
भरारी पथकातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, परिविक्षाधीन उपनिरीक्षक प्रकाश कदम आणि पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.