सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी करत उभे ठाकलेले विशाल परब यांच्या वाहनावर अज्ञाताकडून हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला असता संशयित तरुण वेडसर असून त्याने कोणत्याही गाडीवर हल्ला केला नसल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले. सखोल चौकशी करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तो कणकवली येथील चिरेखाणीत कामाला आहे.परब यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला झाला असे वृत्त सर्वत्र पसरताच खळबळ उडाली. मात्र मुळात हा हल्ला नसून कणकवलीकडे जाण्यासाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिरेखाण कामगाराला हल्लेखोर म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सहानुभूतीसाठी करण्यात आला का की अन्य काही याचा पोलिस शोध घेत आहेत. परब हे सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बुधवारी रात्री परब यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली अन् संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी संशयित तरूण संजय गोप हा कणकवली येथील विरण गावातील चिरेखणीमध्ये कामाला आहे तो झारखंड रांची येथून मंगळवारी निघाला. त्याच्या सोबत विनोद गोप हा नातेवाईक होता. संजय हा सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे लघु शंकेसाठी उतरला अन् रेल्वे चुकली. जवळ पैसे नसल्याने तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातात काठी होती.दरम्यान, निरवडे मळगाव रस्त्यावरून अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाड्या जात होत्या. या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न संजयने केला. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरल्यावर त्याने घाबरून पळ काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तातडीने तपास करीत संशयित तरुणास ताब्यात घेतले. चौकशीसाठी विनोद गोप याला कणकवलीमधून आणण्यात आले. त्यावेळी हा तरूण थोडा वेडसर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व घटनेचा लेखी जबाब नोंदवून या तरूणाला सोडून दिले. पोलिसांनी तपासाची माहिती विशाल परब यांना ही दिली. त्यांनीही पोलिस तपासावर कोणतेही प्रश्न चिन्ह उभे केले नाही.
विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला: पोलिस तपासात समोर आली 'अशी' माहिती
By अनंत खं.जाधव | Published: October 31, 2024 4:30 PM