आचरा : घरात घुसून कुणी नसल्याचा फायदा घेत आचरा पोलीस ठाण्याचा विवाहित पोलीस कर्मचारी प्रशांत परशुराम जाधव (वय ३३) याने गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास घरात घुसून युवती हात पकडत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. आचरा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मालवण न्यायालयात जाधव याला हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर जाधव याची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. पोलीस कर्मचारी जाधव यांच्या विरोधात तक्रार देताना पीडित युवतीने म्हटले आहे की, मी रात्रीच्या सुमारास घरात एकटीच असताना पोलीस कर्मचारी जाधव यांनी भ्रमणध्वनीवरून फोन करून विचारले की ‘मी येवू का?’ आपण त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही असे असताना पोलीस जाधव यांनी घरात घुसून माझा हात पकडला. त्यावेळी आपण मोठ्याने आरडाओरड केली असता माझे नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेत त्याच्या तावडीतून सोडविले व जाधव यांना पकडून ठेवले. या घटनेची माहिती आचरा पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना देताच लागलीच निंदनीय कृत्य करणाऱ्या जाधव यांना ताब्यात घेतले. प्रशांत जाधव यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी विजय खरात हे आचरा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी मालवणच्या माजी सभापती निलिमा सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत खरात यांच्याकडे नि:पक्षपातीपणे या घटनेचा तपास करण्याची मागणी केली. कुंपणच शेत खाऊ लागल्याप्रमाणे खाकी वर्दीतील निंदनीय कृत्य करू लागले तर कायद्याचे रक्षक महिलांचे संरक्षण कसे काय करणार असा सवाल त्यांनी करत त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी संतोष कोदे, विनायक परब, राजन पांगे, विश्वास गावकर, अभिजीत सावंत, विजय कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलीस कर्मचाऱ्याकडून युवतीचा विनयभंग
By admin | Published: October 04, 2014 11:27 PM