मालवण : देशी दारू व्यावसायिकाकडून हप्त्यापोटी ठरविण्यात आलेली ७०० रुपयांची रक्कम स्वीकारताना मालवणातील पोलीस अधिका-याला ‘लाचलुचपत’ विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मसुरे दूरक्षेत्रात मंगळवारी दुपारी सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात आली होती.
याप्रकरणी संशयित मसुरे दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर याची सखोल चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, पोलिसी कारवाईबाबत पोलीस अधिका-यांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.
मालवण ठाण्याच्या अंतर्गत मसुरे दूरक्षेत्राच्या हद्दीतील बागायत येथील देशी दारू व्यावसायिकाकडून हप्त्यापोटी पोलीस अधिका-याने सातशे रुपये ठरविले होते. यातील यापूर्वी नांदोसकर याने काही हप्ते स्वीकारले होते. पोलिसाकडून सततच्या होणा-या त्रासाला कंटाळून देशी दारू व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी दुपारी तीन वाजता कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर लाचलुचपत अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपात माहिती उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.
संशयित नांदोसकरवर लाचलुचपतने कारवाई केल्यानंतर त्याने आणखी काही जणांकडून हजारोंची रक्कम हप्त्यापोटी घेतली अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्यानुसार नांदोसकर याची सखोल चौकशी सुरू होती, असे समजते.