कणकवली : कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून चारचाकी गाडीसह गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. या कारवाईत दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, रात्रीची गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना कोल्हापुरच्या दिशेने दारू वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या सूचनेनुसार २९ रोजी पहाटे ३ वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचला होता.संशयित चारचाकी कणकवलीत दाखल होताच पोलिसांकडून तिला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र ती न थांबल्याने कणकवली ते फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीपर्यंत तिचा पाठलाग करण्यात आला.या चारचाकीमध्ये (जी. ए.- ०१-इ-५२५८) १ लाख ३ हजार ६८० रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संशयित आरोपी संतोष पांडुरंग देऊलकर (२७, रा. बिबवणे, कुडाळ) व म्यालविन मायकल फर्नांडिस (२२, रा. पेडणे-गोवा) यांना अटक केली.या कारवाईत बापू खरात यांच्यासह चालक जमादार झुजे फर्नांडिस, हवालदार उत्तम पवार, सुयोग पोकळे, सलिम सय्यद हे सहभागी झाले होते. दोन्ही संशयित आरोपींना देवगड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : पोलिसांची कारवाई, दोघांना अटक : अवैध दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 6:00 PM
कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून चारचाकी गाडीसह गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. या कारवाईत दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
ठळक मुद्देकणकवली पोलिसांची धडक कारवाई, दोघांना अटक अवैध दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त