सुधीर राणे
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात उमेदवारांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. प्रतीक्षेत असलेले प्रभागाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्रपणे अथवा दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारीहि काही इच्छुकांनी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवलीत पक्ष प्रवेशा बरोबरच जोरदार राजकीय नाटय रंगणार आहे.कणकवली नगरपंचायतीच्या या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून जाणार आहे. तसेच नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.
सध्या उपनगराध्यक्ष असलेले कन्हैया पारकर भाजपकडून नगराध्यक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर नगरसेविका राजश्री धुमाळे यांनीही नगराध्यक्ष पदावरील आपली दावेदारी सोडलेली नाही.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे , किशोर राणे, अभय राणे यांच्यासह आणखिन काहीजण इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सुशांत नाईक, शेखर राणे तर काँग्रेसकडून विलास कोरगावकर व राष्ट्रवादिकडून अबिद नाईक हे सुध्दा आपले नशीब नगराध्यक्ष पदासाठी अजमावण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय आणखिन काहीजण इच्छुक असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यावरच ते जोमाने प्रचारात उतरणार आहेत. सध्या त्यांच्याकडून शहरातील विविध प्रभागात संपर्क करून मतदारांचा कल अजमावला जात आहे.विविध राजकीय पक्षांबरोबरच काही नागरिकांकडून शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी विविध प्रभागात बैठका सुरु झाल्या आहेत.नवीन प्रभाग आरक्षणामुळे काही विद्यमान नगरसेवकांच्या पुन्हा निवडणूक लढवून नगरसेवक बनण्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविता येईल का? यादृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. मात्र इच्छुकांची संख्या जास्त असल्याने दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लधविण्याची संधी मिळणे तसे कठिणच आहे.विद्यमान नगरसेवकांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या विद्यमान नगरसेवकांपैकी रूपेश नार्वेकर, सुविधा साटम, नंदिनी धुमाळे, सुमेधा अंधारी, मेघा गांगण आदी नगरसेवक आपापल्या प्रभागात निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. तर माजी नगरसेवकांपैकी भाई परब ,अभय राणे, बाबू गायकवाड़ पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.इतर उमेदवारांपैकी प्रभाग तिन मधून संदीप नलावडे, प्रभाग चार मधून संजय कामतेकर, उमेश वाळके, बाळू पारकर, प्रभाग अकरा मधून सुजीत जाधव, लवू पवार, राजू कासले, विराज भोसले, प्रभाग बारा मधून गौरव हर्णे, नंदू आरोलकर, मिथुन ठाणेकर, वैशाली आरोलकर, प्रभाग तेरामधून संजय मालंडकर, प्रसाद दुखंडे, राजन परब, प्रभाग चौदामधुन संजय पारकर, बाळा माणगावकर आणि प्रभाग सतरा मधून प्रवीण सावंत, बाबू गायकवाड़, विलास जाधव आदी उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे.नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना याच महिन्यात वेग येणार आहे. तोपर्यन्त राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार पूर्वतयारी करीत आहेत. त्यामुळे वरुन शांत वाटत असलेली कणकवली आतून मात्र पूर्णतः ढवळून निघाली असल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे.नगराध्यक्ष पदावर मराठा उमेदवाराची वर्णी लागणार का?कणकवली शहरात मराठा समाजाची जास्त लोकसंख्या आहे.मात्र, नगरपंचायत निवडणुकीत पडणाऱ्या आरक्षणामुळे मराठा समाजातील पुरष उमेदवारांना नगराध्यक्षपदाने अनेक वेळा हुलकावणी दिली आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे.
त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, राजकीय पक्षांकडून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी मराठा समाजातील उमेदवार दिला जाणार का? याबाबत सध्या कणकवली शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच मराठा समाज बांधवांकडूनही या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु करण्यात आली आहे.