वैभववाडी : पैशाने ज्ञान मिळविता येत नाही. परंतु ज्ञानाच्या जोरावर भरपूर पैसा मिळविता येतो. त्यामुळे राजकारण्यांनी समाजात पैसा नव्हे तर नॉलेज ‘शेअर’ करण्याची गरज आहे, असे आवाहन करीत विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने करा आणि स्वत:चा शोध घेऊन ध्येय निश्चित करा, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी गुणवंतांच्या सत्कार समारंभात केले.भाजपा युवा मोर्चाच्यावतीने येथील तालुका संपर्क कार्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती मानाजी गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र राणे, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर नकाशे, उद्योजक गिरीश साठे, गजानन पाटील, संतोष हरयाण आदी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे अख्खे जग तळहातावर आले आहे आणि ते समजून घेण्याचे भाग्य आताच्या पिढीला लाभले आहे. जे आमच्या नशिबी नव्हते. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. याच वयात स्वत:ची क्षमता, कमकुवत बाजू, संधी आणि भीती यांचा शोध घेऊन ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते ती कधीही टळायला देऊ नका. जीवनाची दिशा ठरविण्यासाठी वेळ खूपच कमी लाभतो. त्यामुळे एक क्षणही वाया जावू देऊ नका. जठार पुढे म्हणाले, गरजेपेक्षा अधिक अडवून ठेवण्यापेक्षा आयुष्यात दुसऱ्याला जागा करून देण्याचा प्रयत्न करा. तेच मोठे सत्कर्म असते. आईवडील, पालक आणि गुुरुजनांच्या अपेक्षांचा आदर बाळगून अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. अपयश हे पुन्हा प्रयत्न करण्याची संधी देत असते. काहीच न करणाऱ्यांचा कधीच जयजयकार होत नसतो. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर अडचण आली तर साद घाला मी तुमच्या सोबत असेन असा विश्वास आमदार जठार यांनी विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)
राजकारण्यांनी ‘नॉलेज’ शेअर करावे
By admin | Published: July 10, 2014 12:15 AM