कणकवली : मुंबईतील इंदू मिलच्या जागेबाबत आंबेडकरी जनतेने केलेल्या आंदोलनाला यश आले. परंतु ही जागा राज्य शासनाच्या ताब्यात मिळालेली नाही. या जागेच्या हस्तांतरणाबाबत राजकारण करण्यात येत आहे. असा आरोप करतानाच या जागेच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायला एक तर पंतप्रधान दुबळे आहेत किंवा राज्य शासन जाणीवपूर्वक हस्तांतरणाबाबत दिरंगाई करीत आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे शासनाने याबाबतची आपली भूमिका आंबेडकरी जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.रिपब्लिकन सेनेच्यावतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती, तसेच रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता मेळावा येथील बुद्ध विहाराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही लढा दिला. त्याला यशही मिळाले. या जागेवर स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. परंतु ही जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यास वेळ काढण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांकडून रोज वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष वाढत आहे. त्यासाठी शासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करायला हवी.रायगड ते सिंधुदुर्ग असा चार दिवसांचा कार्यकर्त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आपण आखला आहे. मुंबईतून सिंधुदुर्गात येईपर्यंत राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाल्याचे आपल्या निदर्शनास आले. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे शासनाने या महामार्गाच्या कामाला गती द्यावी.गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. तसेच तशा सुविधा शासनाने येथे उपलब्ध करून द्याव्यात. कोकणातील शेतकरी, बागायतदार हवामानातील बदलामुळे हवालदिल झाले आहेत. त्यांना उसाप्रमाणे आर्थिक मदत देऊन शासनाने दिलासा द्यावा. अशा विविध मागण्याही आंबेडकर यांनी यावेळी केल्या. तसेच त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले. (वार्ताहर)
इंदू मिलच्या जागेबाबत राजकारण
By admin | Published: May 18, 2016 10:30 PM