दापोली : तालुक्यातील कादिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत २७ मार्च १५ रोजी सकाळी ९ वाजता माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. वार्षिक तपासणीसाठी आलेल्या विस्तार अधिकाऱ्याने जुना राग मनात ठेवून धारदार चाकूने वार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उपशिक्षक सुशील पावरा यांनी दिली होती. या प्रकरणातील दोषीला अटक होण्यापूर्वीच या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. शिक्षक सुशील पावरा, विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे व पावरा यांच्या पत्नीची बदली झाल्याशिवाय मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कादिवली मराठी शाळेत सुशील पावरा हे उपशिक्षक आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वी आवाशी येथून कादिवली येथे कामगिरीवर पाठवण्यात आले होते. वार्षिक तपासणीत शाळेच्या मुख्याध्यापकांकडून माहिती घेण्याऐवजी आपल्याला टार्गेट करण्यासाठी व सूड घेण्याच्या हेतूनेच विस्तार अधिकारी ठरवून त्या शाळेत दाखल झाले होते, असे पावरा यांचे म्हणणे आहे. आपली काही महत्त्वाची कागदपत्र शिक्षण विभागाकडून गहाळ झाल्याने गेली दोन वर्षे ते न्याय मागत आहेत. मात्र, न्याय काही मिळालाच नाही. उलट त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचे पावरा यांचे म्हणणे आहे. दापोली शिक्षण विभागाकडून सहकार्य न मिळाल्याने पावरा यांनी कोकण आयुक्तांकडे अपील केले होते. आयुक्तानी माहितीच्या अधिकारात पावरा यांनी दिलेल्या अर्जाची १ महिन्यात चौकशी करुन अहवाल देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आली आहे.त्याचा राग मनात धरुन सूड उगवण्याच्या हेतूने विस्तार अधिकारी शिंदे सकाळी आठ वाजता कादिवली शाळेत हजर झाले. त्यावेळी पावरा हे विद्यार्थ्यांना शिकवत होते. यावेळी ते वर्गात येऊन उद्धटपणे बोलू लागले व मी जे सांगेन तेच शिकवा. तुमचे अभ्यासपत्रक दाखवा, असे ओरडू लागले. त्यांचा हेतू आपल्याला त्रास देण्याचाच होता, असे पावरा यांचे म्हणणे होते. माहितीच्या अधिकारात माहिती दिली नाही म्हणून कोकण आयुक्तांकडे अपील केले. त्यांनी एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याचाच राग धरुन हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता या प्रकरणात राजकारण शिरले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, माता - पालक संघ, शिक्षक - पालक संघ यांनी विस्तार अधिकारी एन. के. शिंदे, शिक्षक पावरा व त्यांची पत्नी यांनी शाळेत राहू नये, यासाठी शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.शाळेतील वातावरण दूषित होऊ नये, यासाठी शिक्षक पावरा व त्यांची पत्नी या दोघांचीही बदली करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. हे शाळा बंद आंदोलन मंगळवारीही सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)दरम्यान, शाळा बंद आंदोलन आणि एकूणच घडलेल्या घटनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांची बैठक होणार आहे.दापोली येथील विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे हे वादग्रस्त असून, त्यांच्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कादिवलीतील या प्रकारामुळे एकूणच वातावरण बिघडले असून, आता हे प्रकरण राजकीय वळण घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कादिवलीत राजकारण; शिक्षक पती-पत्नीच्या बदलीसाठी शाळा बंद
By admin | Published: March 30, 2015 10:35 PM