कणकवली : सध्या उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. उष्म्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात जर माठातील पाणी मिळाले तर मनाला वेगळेच समाधान मिळते. यासाठी आजच्या काळातही गरिबांच्या या फ्रीजला (मातीचा माठ) दिवसागणिक मागणी वाढत आहे.
माठ बनविणारे स्थानिक कुंभार किंवा कारागीर कमी झाल्याने माठांचे उत्पादन घटले आहे. हे माठ आता चढ्या दराने विकले जातात. कणकवली आठवडा बाजारात तसेच अन्य ठिकाणीही माठांची मागणी वाढत आहे.पाणी हे जीवन असे म्हटले जात असताना उन्हाळ्यात एक वेळ खाण्यास काही नाही मिळाले तरी चालेल, मात्र माठातील थंड पाणी पिण्यास मिळाले तर वेगळेच आत्मिक समाधान मिळते. आजही अनेक सामान्य कुटुंबातील घरांमध्ये फ्रीज नसल्याने माठाचा वापर केला जातो. माठातील पाणी हे ज्या प्रक्रियेतून थंड होते आणि थंड झालेले हे पाणी पिण्यास जी ओढ असते ती इतर कसल्याही भांड्यातून साठवून ठेवलेल्या पाण्यास नसल्याने गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.