मालवण 8 : शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य नेहमीच करीत असतात. काही उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. तर काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील दिशा देऊन मोठमोठ्या पदांवर नेऊन ठेवले आहे. अशाप्रकारे कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या काही शिक्षकांनी गरीब व होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेला शिक्षणरूपी अंध:कार दूर करून तिमिरातून तेजाकडे या उपक्रमातून शैक्षणिक क्षेत्रात नवा पायंडा घातला आहे.
एकविसाव्या शतकात काही विद्यार्थ्यांच्या घरात विजेची सुविधा नाही. रॉकेल मिळत नाही, मिळालेच तर दिवा नीट पेटेल याची खात्री नसते. अभ्यास करायची तीव्र इच्छा असली तरी होतकरू मुलांना अभ्यासावेळी अंधार मात्र अडचणीचा ठरतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अनेक विद्यार्थी मार्गक्रमण करीत असतात. पण आजूबाजूला सर्वत्र अंधार असेल तर वाट काढणे मुश्किलीचे होते. ज्याच्या घरात विजेची सोय नाही अशा विद्यार्थ्याच्या घरी सौर दिव्यांची सोय करून विद्यार्थ्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याचा स्तुत्य उपक्रम वराडकर हायस्कूल कट्टामधील शिक्षकांनी हाती घेतला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास तेजोमय करण्याच्या घातलेल्या पायंड्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
शाळेत शिकणाºया व दोन किंवा दोनपेक्षा जास्त भावंडांचा या उपक्रमामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टामधील शिक्षक व शिक्षिकांनी स्वत: पैसे काढून दोन कुटुंबांच्या घरात सौर दिवे देऊन त्यांचे कित्येक वर्षे अंधारात असलेले घर प्रकाशाने उजळून टाकले आहे. पाचवी ते दहावीमध्ये शिकणाºया सोमनाथ, दीपाली, मनीषा, ज्ञानदा या पाटकर कुटुंबातील तसेच संतोष, मीना, सीमा या खोत कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन दिव्यांचा एक सौर संच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वितरित करण्यात आले.
खोत, पाटकर कुटुंबीयांना सौर संच देण्यासाठी शिक्षक संजय नाईक, समीर चांदरकर, संजय पेंडूरकर, महेश भाट, प्रकाश कदम, प्रणिता मुसळे, देवयानी गावडे, ज्योती मालवदे, अमृता दळवी, सिमरन चांदरकर, संध्या तांबे तसेच सुकळवाड येथील दाभोलकर यांचे सहकार्य लाभले.घरे झाली तेजोमयगेली कित्येक वर्षे या दोन कुटुंबीयांच्या घरात वीज नव्हती. दोन्ही कुटुंबातील विद्यार्थी हुशार असल्याने शिक्षकांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले. खोत व पाटकर कुटुंबीयांना शिक्षकांनी सौर युनिट वितरित केले तेव्हा विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर पालकांच्या चेहºयावरही चैतन्य उमटले. त्यावेळी पालकांच्या डोळ्यातून ओघळलेले आनंदाश्रू त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या. या गरीब व होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या घरी प्रकाश आल्याने दिवाळीपूर्वी घरे तेजोमय झाली आहेत.शिक्षकांना प्रोत्साहन मिळायला हवेकट्टा हायस्कूलच्या शिक्षकांनी एकत्र येत स्वखर्चाने तिमिरातून तेजाकडे हा उपक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात दोन कुटुंबीयांची निवड करत दोन सौर संच देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती उचललले पाऊल कौतुकास्पद असून त्यांच्या उपक्रमाला पाठबळ लागणेही आवश्यक आहे. शिक्षक संजय नाईक म्हणाले, आमच्या प्रशालेतील अजून अनेक विद्यार्थी अंधारात शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यामुळे दुसºया टप्प्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या घरातील अंध:कार दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.