लोकमत न्यूज नेटवर्कदापोली : खेड तालुक्यातील पोयनार धरण हे १९७२ साली मंजूर झालं. त्यानंतर १९९६-९७साली प्रत्यक्ष धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या धरणामुळे खेड - दापोली या दोन तालुक्यांमधील २५ गावांची पाणी समस्या दूर होणार आहे. मात्र, राजकीय मंडळींकडून आजपर्यंत धरणाच राजकारणच करण्यात आलं. येथील धरणग्रस्तांच्या समस्या लोकप्रतिनिधींनी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे २० वर्षाहून अधिककाळ लोटला, तरीही पोयनार धरणग्रस्तांना उपेक्षितांसारखे जीवन जगावे लागत आहे.पोयनार व धामणी या दोन गावांच्या सीमेवर पोयनार धरणाचे काम अतिशय संथगतीने गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. या धरणाचे काम अनेकदा बंद पडले व पुन्हा सुरु झाले. या धरणाचे काम करणारे अनेक ठेकेदार बदलले व अनेक अधिकारीही बदलून गेले. मात्र, धरणाचे काम ज्या गतीने व्हायला हवे होते, त्या गतीने झालेले नाही. धरण कामाच्या संथ गतीमुळे या धरणाचे बजेटही पाचपट वाढले आहे. सरकारच्या तिजोरीवरही फुकटचा ताण वाढला. धरणाचे काम लवकर पूर्ण होऊन पाणी मिळावे, या माफक अपेक्षेने येथील जनता गेली अनेक वर्षे प्रतीक्षा करीत आहे. परंतु, ‘सरकारी काम, अनेक वर्षे थांब’ या म्हणीप्रमाणे या धरणाचे काम आजही सुरु आहे. या धरणाचे सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.पोयनार धरणामुळे २५ गावांची पाणी समस्या दूर होणार असल्याने या गावातील ‘व्होट बँके’वर नजर ठेवून राजकीय पुढारी तुम्हाला लवकरच धरणाचे पाणी देऊ, असे सांगत आहेत. पोयनार धरण आपणच मार्गी लावले असून, २५ गावांमधील पाणीटंचाई दूर करु व हा भाग सुजलाम सुफलाम करु, अशी घोषणा करुन राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. एका बड्या नेत्याने तर चक्क दिवाळीत या धरणाचे पाणी देऊन फटाके फोडण्याची घोषणा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय श्रेय घेणाऱ्या या पुढाऱ्यांना धरणाचे निकृष्ट काम व धरणग्रस्तांचे अश्रू आजपर्यंत दिसले नाहीत का? त्यामुळे श्रेय घेऊ पाहणारे पुढारी आजपर्यंत कुठे होते, असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.पोयनार धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी कवडीमोल किंमतीने या धरणासाठी दिल्या. मात्र, आज हेच धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. धरणाच्या बुडीत क्षेत्रात जमिनी, घरे गेल्यामुळे पोयनार रामवाडी व बौद्धवाडीतील लोकांना पुनर्वसित व्हावे लागले आहे. यातील बौद्धवाडीचे पुनर्वसन झाले असून ते चुकीच्या पद्धतीने झाले आहे. धरणाशेजारीच बौद्धवाडीचे पुनर्वसन केले आहे. लोकांनी कर्ज काढून येथे घरे बांधली आहेत. मात्र, आता पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने याठिकाणची घरे पुन्हा दुसरीकडे पुनर्वसित करावी, असे येथील अधिकारी खासगीत बोलत आहेत. एकदा पुनर्वसित व्हावे लागले आहे. आता सरकारच्या चुकीमुळे पुन्हा तेच करायचे का? असा सवाल ग्रामस्थ विचारु लागले आहेत.ंपुनर्वसन आराखडा नाहीपोयनार धरणाची गळभरणी करण्याची व राजकीय श्रेय घेण्याची घाई राजकीय पुढाऱ्यांना लागली आहे. परंतु, ज्या लोकांच्या जमिनी धरणासाठी गेल्या, २० वर्षांपासून भूमिहीन म्हणून जीवन जगण्याची वेळ ज्यांच्यावर आली, त्यांच्या समस्या व धरणग्रस्त म्हणून शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी मात्र याच राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे धरणग्रस्त ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले असून, येथील पुनर्वसन आराखडा व संकलन रजिस्टर शासनाकडे तयार नसल्याने त्यांना न्याय मिळणेदेखील कठीण झाले आहे.
पोयनार धरणग्रस्त आजही उपेक्षितच
By admin | Published: May 05, 2017 11:31 PM