रत्नागिरी : राज्यातील खासगी व शासनाच्या ताब्यात असलेली सर्वच बंदरे विकसित करून जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही केली जाणार आहे. जिंदल कंपनीचे जयगडमधील बंदर हे अत्याधुनिक बंदर असून, दिघी व उरण ही बंदरेही विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या बंदर विभागाचे अतिरिक्त सचिव गौतम चॅटर्जी यांनी जयगड येथे पत्रकारांना दिली. जिंंदालच्या जयगड बंदरात इंडियन फ्रेंडशीप हे महाकाय जहाज १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा घेऊन तब्बल चौदा दिवसांचा सागरीप्रवास करून दाखल झाले आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बंदर विभागाचे संयुक्त प्रबंधक बी. व्ही. के. शर्मा यांनी सांगितले की, भविष्यात तीन लाख मेट्रिक टन माल जहाजातून आणून देशात हे बंदर अव्वल ठरेल. गेल्या सात वर्षांपासून जिंदलचे हे बंदर कार्यरत असून, आधुनिकतेच्या स्तरावर अनेक सुधारणा करीत मालवाहतुकीत या बंदराने विक्रम केले आहेत. त्यामुळे देश-विदेशातील मालवाहतूकदार कंपन्यांकडूनही बंदराला पसंती मिळत आहे. या बंदराचा अजूनही मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाणार असून, त्यामुळे मालवाहतुकीची क्षमता आणखी वाढणार आहे. या बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक होत असून, त्यामुळे बंदरात येणारा माल रेल्वेद्वारे वाहतूक करणे किफायतीर ठरणार आहे. जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंदल कंपनीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा, बंदर विभागाचे मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, हिरानंदानी ग्रुपचे दर्शन हिरानंदानी, जिंदाल कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, अन्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. राज्यातील पहिले मोठे बंदर म्हणून जिंदाल बंदराची ओळख या जहाजामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस.जिंदल कंपनीचे जयगडमधील अत्याधुनिक बंदर.जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंंदाल कंपनीतर्फे स्वागत.जहाजात १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा.
बंदरे विकसित होणार : चॅटर्जी
By admin | Published: April 17, 2015 10:54 PM