सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्यातील शासकीय, निमशासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केला जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ``गतिमान आणि प्रगतिशील प्रशासन देण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. राज्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्थामध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे.''
राज्यात 5 लाख कंत्राटी कर्मचारी मंत्रालय ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या विभागात काम करत आहे. परंतु, त्यांना वेतन कमी असून, ते वेळेवर होत नाही. तसेच ठेकेदाराकडून होणारी पिळवणूक व अधिकाऱ्यांचा वाढत्या दबावामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. या कंत्राटी कामगारांना सरकारने सेवेत नियमित केल्यास कुटुंबाचा प्रश्न सुटेल, याकडे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
राज्यातील शासकीय व निमशासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना महासंघाचे पदाधिकारी. सोबत आमदार निरंजन डावखरे.